Join us  

...त्यांच्या हलगर्जीने दीड हजार कुटुंबांचा जीव टांगणीला; सोसायटीत अस्वस्थता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 12:49 AM

लंडनहून परतलेला ठाण्यातील रहिवासी कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई : ठाण्याच्या वर्तकनगर भागातील एका सोसायटीत राहणारे राजेश महाजन (नाव बदलले आहे) कामानिमित्त लंडनला गेले होते. १५ मार्चला भारतात परतल्यानंतर त्यांनी १४ दिवसांचा होम क्वारंटाईन प्रोटोकॉल पाळला नसून ते कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे रविवारी निष्पन्न झाले. या वृत्तामुळे सुमारे दीड हजार कुटुंबांचे वास्तव्य असलेल्या या सोसायटीत अस्वस्थता पसरली असून आपल्याला कोरोनाची लागण झाली नसेल ना या भितीने अनेकांना पछाडले आहे.

या सोसायटीत जवळपास १५ गगनचुंबी इमारती असून त्यांच्या वेगवेगळ््या सोसायट्या आहेत. त्यापैकी एका सोसायटीतल्या सी इमारतीच्या २० व्या मजल्यावर महाजन आपल्या पत्नीसह भाडेतत्वावरील घरात रहातात. लंडनहून परतल्यानंतर सरकारच्या आदेशानुसार त्यांनी किमान १४ दिवस स्वत:ला होम कॉरेंटाईन करणे आवश्यक होते. मात्र, आजाराची कोणतीही लक्षणे दिसत नसल्याने त्यांनी आपले नियमित कामकाज सुरू केले होते.

कामानिमित्त ते दिवसभर घराबाहेर असले तरी त्यांच्या पत्नीचा सोसायटीत वावर होता. पाच दिवसांपुर्वी अस्वस्थ वाटू लागल्यानंतर महाजन एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल झाले होते. तिथे केलेल्या तपासणीअंती महाजन हे कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. या वृत्तानंतर पालिकेची पथके सोसायटीत दाखल झाली. त्यांनी महाजन यांच्या पत्नीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

सोमवारी सकाळी पालिकेच्या पथकांनी सी इमारतीसह सभोवतालच्या परिसर निर्जंतूक करण्यासाठी फवारणी केली. त्याशिवाय इथल्या प्रत्येकाच्या घरात जात कुणी आजारी नाही ना याची चाचणी केली. या इमारतीत किती जण राहतात, त्यापैकी किती जण परदेशात जाऊन आले आहेत अशी सखोल चौकशी करून प्रत्येकाचे फोन नंबरही या पथकांनी नोंदवून घेतले आहेत.

महाजन यांच्या पत्नीला कोरोनाची लागण झाली आहे की नाही याचा अहवाल मंगळवारी संध्याकाळपर्यंत अपेक्षित आहे. तो जर पॉझिटीव्ह आला तर या इमारतीतल्या रहिवाशांसह सोसायटीवरही काही निर्बंध लादले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अफवांना वेग

सी क्रमांकाची इमारत २१ दिवसांसाठी सील करणार, प्रत्येकाची कोरोना टेस्ट केली जाणार, सोसायटीची नाकाबंदी करून कुणालाही बाहेर पडू दिले जाणार नाही यांसारख्या अनेक अफवांचा बाजार सोमवारी तेजीत होता. त्यामुळे भेदरलेल्या अनेकांनी पुढल्या काही दिवसांचे किराणा सामान आणि भाजीपाला आणण्यासाठी धावपळ केली.

व्हॉटसअ‍ॅप गु्रप अ‍ॅडमिन पॅनिक मोडवर

सोसायटीत कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्याच्या वृत्तामुळे इथल्या व्हॉटस अ‍ॅप ग्रुववरील उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. त्यातून अनेक अफवा, गैरसमज आणि चुकीच्या माहितीचा प्रसार सुरू झाला. अनेक जण पॅनिक मोडमध्ये गेले. त्यातून होत असलेला गोंधळ टाळण्यासाठी पालिकेने दिलेल्या सुचनेनुसार सोसायटीतले बहुसंख्य व्हॉटस अ‍ॅप ग्रुप अ‍ॅडमीन मोडवर टाकण्यात आले आहेत.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्याठाणे