Join us

ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी गडगडाटासह पाऊस पडणार

By सचिन लुंगसे | Updated: February 22, 2024 18:05 IST

नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली तसेच कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे पहाटेचे किमान तापमान १४ तर कमाल ३० ते ३२ अंश आहे.

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील हवामानात बदल होत असून, कमाल तापमानाचा पारा वाढत असतानाच दुसरीकडे विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यासह मराठवाड्यातील जालना, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात २५ ते २७ फेब्रुवारी दरम्यानच्या ३ दिवसांत ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी गडगडाटीसह किरकोळ पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.सद्यस्थितीमध्ये नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली तसेच कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे पहाटेचे किमान तापमान १४ तर कमाल ३० ते ३२ अंश आहे. ही तापमाने जवळपास सरासरी इतके किंवा त्याखाली आहेत. महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यात ही तापमाने काहीशी अधिक असुन ती १७ व ३४ दरम्यान आहेत.फेब्रुवारीअखेर सध्याचा हिवाळी हंगाम संपून पूर्वमोसमी पावसाचा हंगाम सुरु होण्याचा संक्रमणाचा हा काळ असतो. साधारणपणे पूर्वमोसमी हंगामात पूर्व मध्य प्रदेश ते तामिळनाडूतील कन्याकुमारीपर्यंत पूर्व किनारपट्टी समांतर वक्रकार हवेच्या कमी दाबाचा आस किंवा वारा खंडितता प्रणाली दिसू लागतात. या आस किंवा पट्ट्याच्या पश्चिमेला उत्तेकडून तर पूर्वेला दक्षिणेकडून आर्द्रतायुक्त वाऱ्यांच्या मिलनातून गडगडाटीसह विजा, गारांचा पाऊस कोसळत असतो. त्यामुळे विदर्भ मराठवाड्यातील जिल्ह्यात किरकोळ पावसाची शक्यता आहे, अशी माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली. 

 

टॅग्स :पाऊस