Join us
Daily Top 2Weekly Top 5

सलमानच्या घरावर गोळीबार करणारे फरार; ते दाेघे हल्लेखोर हरयाणा, राजस्थानचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 07:52 IST

काही महिन्यांपूर्वी रोहतकमध्ये भंगार व्यापारी सचिनची गोळ्या झाडून हत्या केल्याचा त्याच्यावर आरोप असून तो फरार आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरापैकी एक विशाल ऊर्फ कालू याची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे. कालू हा हरयाणातील गुरुग्रामचा रहिवासी आहे. काही महिन्यांपूर्वी रोहतकमध्ये भंगार व्यापारी सचिनची गोळ्या झाडून हत्या केल्याचा त्याच्यावर आरोप असून तो फरार आहे. 

विशाल हा परदेशात राहणाऱ्या गँगस्टर रोहित गोदारासाठी काम करतो. तर, गोळीबारात सहभागी असलेला दुसरा आरोपी राजस्थानचा असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. रविवारी पहाटे दोन बाइकस्वारांनी सलमानच्या इमारतीवर गोळीबार केला. त्यानंतर या दोन्ही हल्लेखोरांनी काही अंतरावर दुचाकी सोडत वांद्रे स्टेशन गाठले. तेथून त्यांनी पहाटे ५ वाजून ८ मिनिटांची बोरिवलीच्या दिशेने जाणारी लोकल पकडली. मात्र, हे दोघेजण मध्येच सांताक्रूझ रेल्वे स्थानकात उतरले.

- सव्वापाचच्या सुमारास सांताक्रूझ रेल्वे स्थानकातून हे दोघे वाकोल्याच्या दिशेने चालत गेले. - पुढे, ऑटोरिक्षा पकडून दोघेही मुंबईबाहेर पसार झाल्याची माहिती मिळते. - पोलिसांनी वांद्रे आणि सांताक्रूझ रेल्वे स्थानक, वाकोला आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली आहे. - दोन्ही हल्लेखोरांनी ज्या ऑटोरिक्षाने प्रवास केला त्या रिक्षाचालकाचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे.- तसेच अन्य साक्षीदारांकडे अधिक तपास सुरू आहे.

ईदच्या गर्दीतही शूटर्स?दोघेही आरोपी ईदनिमित्ताने सलमान खानच्या घराबाहेर जमलेल्या चाहत्यांच्या गर्दीतही गेल्याचा संशय पोलिसांना आहे.

टॅग्स :मुंबईसलमान खान