- मनीषा म्हात्रे
मुंबई : जेहबाबाच्या बाथरूममधून मध्यरात्रीच्या सुमारास अचानक एक जण बाहेर आला. त्याच्या हातात ब्लेडसारखे काही तरी होते. त्याच्या धाकात त्याने एक कोटी रुपयांची मागणी करत हल्ला चढवला. मदतीसाठी पुढे आलेल्या सैफ बाबावर तो सपासप वार करत होता... हल्ल्याचा थरार सांगताना सैफच्या घरी काम करणाऱ्या केअरटेकर एलियामा फिलीप (५६) यांचा थरकाप उडत होता.
फिलीप यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार त्या चार वर्षांपासून सैफ यांच्या घरात स्टाफ नर्स म्हणून काम करतात. सैफ यांचा धाकटा मुलगा जहांगीर ऊर्फ जेहबाबा यांचा सांभाळ त्या करतात. खान कुटुंबीय ११ व १२ व्या माळ्यावर राहतात. ११ व्या माळ्यावर ३ रूम असून त्यातील एका रूममध्ये सैफ, करिना राहतात. दुसऱ्या रूममध्ये तैमूर, तर तिसऱ्या रूममध्ये जेहबाबा राहतात.
१५ जानेवारी रोजी रात्री अकरा वाजता जेहबाबाला जेवण करून झोपवले. त्यानंतर, मी व जुनू झोपी गेलो. पहाटे दोनच्या सुमारास काही तरी आवाज आल्याने जाग आली. त्यावेळी बाथरूमचा दरवाजा उघडा दिसला. तेव्हा एक जण बाथरूममधून बाहेर येऊन जेहबाबाकडे जाऊ लागला. ‘कोई आवाज नही और कोई बाहर भी नही जाएगा’ असे बोलून त्याने आम्हाला धमकावले. जेहबाबाला उचलण्यास जाताच तो अंगावर धावून आला. त्याच्या डाव्या हातात लाकूड, तर उजव्या हातात लांब ब्लेड होते. झटापटीत त्याने माझ्यावर ब्लेडने वार करण्याचा प्रयत्न केला.
‘आपको क्या चाहिए’ विचारताच एक कोटीची मागणी केली. आरडाओरडा केला. तेव्हा, सैफ आणि करिना धावले. सैफने त्याला हटकले असता त्याने सैफवर सपासप वार केले. त्यावेळी तैमूरची आया गीता मधे आली. तिच्यावरही त्याने हल्ला केला. सैफबाबाने त्याच्यापासून सुटका करून घेताच आम्ही सर्व रूमच्या बाहेर धावलो. आमचा आवाज ऐकून स्टाफ रूममध्ये झोपलेले रमेश, हरी, रामू व पासवान बाहेर आले. त्यांच्यासह आम्ही पुन्हा रूमकडे गेलो असता रूमचा दरवाजा उघडा होता. हल्लेखोराचा घरात शोध घेतला असता तो दिसला नाही.
चोरटा दोन तास घरातच? सैफच्या इमारतीत बाहेरच्या व्यक्तीला प्रवेश करण्यापूर्वी गेटवरील सुरक्षारक्षकांकडून पडताळणी केल्यानंतर पुढे सोडण्यात येते. मात्र, रात्रीच्या सुमारास सुरक्षारक्षकांची नजर चुकवून चोर इमारतीत शिरला आणि आरामात बाहेरही पडला. यावेळी सुरक्षारक्षक जागेवर नसल्याचेही समजते. हल्लेखोर दोन तास घरातच लपून असल्याची माहितीही सीसीटीव्हीच्या तपासणीतून समोर येत आहे.
रुग्णालयातील घटनाक्रमपहाटे सव्वातीनच्या सुमारास अतितत्काळ विभागात सैफला दाखल करण्यात आले. तपासणीमध्ये त्याच्या मणक्यात चाकूचा तुकडा आढळला. डाव्या हाताच्या मनगटावर गंभीर जखम झाली होती. मानेच्या उजव्या बाजूला झालेल्या हल्ल्यामुळे रक्तस्राव सुरू होता. न्यूरोसर्जन नितीन डांगे, हृदयविकारतज्ज्ञ श्रीनिवास कुडवा, प्लास्टिक सर्जन डॉ. लीना जैन आणि भूलतज्ज्ञ डॉ. निशा गांधी यांच्या पथकाने सैफवर उपचार करण्यास सुरुवात केली.
मणक्यातून चाकूचा तुकडा काढण्याची शस्त्रक्रिया मोठी होती. तब्बल अडीच तासांच्या शस्त्रक्रियेनंतर डॉ. नितीन डांगे यांनी चाकूचा तुकडा मणक्यातून काढला. सैफला हृदयविकाराचा त्रास असल्याने हृदयविकारतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास कुडवा ऑपरेशन थिएटरमध्ये उपस्थित होते. डॉ. डांगे यांच्या शस्त्रक्रियेनंतर प्लास्टिक सर्जन डॉ. जैन यांनी सैफच्या डाव्या हातावर आणि मानेवर शस्त्रक्रिया केल्या. त्या दोन तास चालल्या. सकाळी १०.३० वाजता सैफला अतिदक्षता विभागात हलविण्यात आले.
मुंबईतील कायदा, सुव्यवस्था ढासळलीअभिनेता सैफ अली खान यांच्यावर झालेल्या हल्ला हे मुंबईमध्ये कायदा आणि सुव्यवस्था ढासळत असल्याचे लक्षण आहे. या सर्व गोष्टींकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष द्यावे, कारण त्यांच्याकडेच गृहखाते आहे. - शरद पवार, ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री
सैफ यांच्या जिवाला कोणताही धोका नाही. त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी त्यांच्यावर गरजेच्या शस्त्रक्रिया करून उपचार दिले आहेत. त्यांना अतिदक्षता विभागात हलविण्यात आले आहे. - डॉ. नीरज उत्तमानी, सीईओ, लीलावती रुग्णालय.