Join us

आडगावच्या  काही पदार्थांची जिभेवर रेंगाळते चव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2022 08:33 IST

Sanjay Mone : नुसतं कामासाठी म्हटलं असतं तरी चाललं असतं, पण मग आपण बहुआयामी (बहुतेक हाच शब्द असावा) व्यक्तिमत्त्व आहोत हे वाचकांच्या मनावर ठसणार कसं? लोणावळा येथे आमचे स्नेही कल्पनाताई आणि विलास कोठारी यांचा बंगला आहे तिथे.

- संजय मोने, अभिनेते

कधी कधी कल्पना नसताना एखादा प्रयोग अतिशय रंगतो. आजूबाजूला असलेल्या सोयी-गैरसोयी (बहुतेक वेळेला गैरसोयीच) सगळ्यांवर मात करून लोकांना अत्यंत उत्तम असा कलानंद मिळतो, तसंच काहीवेळा एखाद्या आडगावी असा काही पदार्थ खायला मिळतो की पुढे बरेच दिवस जीभेवर चव रेंगाळत राहते. जशी कणकवली येथे कधीच्या काळी खाल्लेले घावन आणि काळ्या वाटाण्याची उसळ. एका चित्रपटाच्या पटकथा आणि संवाद लेखनासाठी गेलो होतो. नुसतं कामासाठी म्हटलं असतं तरी चाललं असतं, पण मग आपण बहुआयामी (बहुतेक हाच शब्द असावा) व्यक्तिमत्त्व आहोत हे वाचकांच्या मनावर ठसणार कसं? लोणावळा येथे आमचे स्नेही कल्पनाताई आणि विलास कोठारी यांचा बंगला आहे तिथे.

या जोडप्याची आणि तुमची ओळख असेल तर मस्तच. रोज सकाळी कामाला सुरुवात करण्यापूर्वी फिरायचं असा माझा शिरस्ता आहे. आमचा दिग्दर्शक आणि त्यांचा सगळा संच फिरायला बाहेर काढला. बोलत बोलत सात-आठ किलोमीटर चाल झाली. सगळे थकलो होतो. एका उपाहारगृहाच्या कट्ट्यावर टेकलो. बंद होतं ते. पाच-दहा मिनिटांत त्याचा दरवाजा उघडला. सुंदर गंध आला. सगळ्यांनी आरडओरड करून आता इथेच खाऊया असा पुकारा केला. ती माझी बुवा मिसळवाले यांची पहिली भेट. तेव्हा ते एका पत्र्याच्या आडोशात उपाहारगृह चालवत होते. पोट फुटेस्तोवर सगळ्यांनी खाल्लं. नाकाडोळ्यातून पाणी वाहत होतं; पण हात थांबत नव्हते. त्यानंतर बहुतेक वेळेला मुंबई-पुणे (किंवा पुणे-मुंबईही) प्रवासात तिथे थांबतो. आता ते उपाहारगृह भक्कम जागेत गेलं आहे. उत्तम भरभराट झाली आहे.

पदार्थ चारच मिळतात. बटाटावडा, मिसळ (तीन प्रकारची तिखट), भजी दोन प्रकारची. आता सोलकढीही मिळते. बटाटावड्याची खासियत म्हणजे जाणवेल असा पुदिना त्यात असतो. त्यामुळे आलं लसणाचा दर्प रेंगाळत नाही. मिसळ मी एकदा आत जाऊन समोर बघून घरी येऊन बनवली; पण ती बात नाही. त्यावर चौकशी केल्यावर कळलं तिथल्या पाण्यात गंमत आहे. मी कधीच बंद बाटलीतले पाणी तिथे प्यायलो नाही. उत्तम चव असते पाण्याला. मिसळीबरोबर जहाल पण मस्त ठेचा मिळतो. माझ्या काही मित्रांसाठी मी तो घेऊन येतो. मालक आणि मालकीण व त्यांची मुलं सगळे उपाहारगृह सांभाळतात. अत्यंत प्रेमाने अगत्याने वागतात. अनेक जणांना मी बुवा मिसळची शिफारस केली सगळ्यांनी एकमुखाने उत्तम ! असा शेरा दिला. 

मुंबईतून पुण्याला जाताना घाट संपला की रस्ता लोणावळ्यात जातो. तिथे एक पंच तारांकित हॉटेल आहे. त्याच्यापुढे पाचशे पावलांवर बुवा मिसळ खिलवतात. शनिवार, रविवार थांबायला लागतं. कधी कधी अर्धा-पाऊण तास; पण तुम्ही तीन-चार वेळा गेलात तर तुमची खास सोय होते. एकदाच भेट द्या ! पुढच्या वेळी वाहनाची चाकं आपोआप वळण घेतील.

टॅग्स :संजय मोने