Join us
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या पिसे जल उदंचन केंद्रातील यंत्रणा हळूहळू पूर्वपदावर; १४ पंप सुरू

By जयंत होवाळ | Updated: February 27, 2024 16:25 IST

सकाळी ११ वाजता दुसऱ्या ट्रान्सफॉर्मरची पाहणी करून तो देखील सुरू करण्यात आला

मुंबई महानगरपालिकेच्या पिसे येथील जलउदंचन केंद्रातील यंत्रणा पूर्वपदावर येत असून सद्यस्थितीत २० पैकी १४ पंप सुरू करण्यात आले आहेत. त्याआधारे पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येत आहे. 

जलउदंचन केंद्रात संयंत्राला  २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी लागलेली आग रात्री दहा वाजता विझवण्यात यश आले. त्यानंतर रात्री बारा वाजेच्या सुमारास एक ट्रान्सफार्मर सुरू करून त्यावर हळूहळू आठ पंप सुरू करण्यात आले. आज  पहाटे चार वाजेपासून पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रातील सुमारे आठ पंप सुरू करण्यात आले. तर, सकाळी नऊ वाजेपासून पूर्व उपनगरे आणि शहर विभागातील गोलंजी, रावळी, फॉसबेरी व भंडारवाडा सेवा जलाशयातून कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. 

त्यानंतर सकाळी ११ वाजता दुसऱ्या ट्रान्सफॉर्मरची पाहणी करून तो देखील सुरू करण्यात आला व त्यावर पिसे उदंचन केंद्रातील इतर सहा पंप हळूहळू सुरू करण्यात आले. अशा रितीने सद्यस्थितीत पिसे जल उदंचन केंद्रातील २० पैकी सुमारे १४ पंप कार्यरत झाले आहेत. त्याआधारे पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येत आहे. आणखी एक पंप कार्यान्वित करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

टॅग्स :पाणीमुंबई