हां, मैं हूँ धारावी का डॉन! वरदराजन मुदलीयार उर्फ वरदाभाईची कहाणी...

By मनोज गडनीस | Updated: September 15, 2025 18:13 IST2025-09-15T18:12:21+5:302025-09-15T18:13:48+5:30

धारावीच्या गुन्हेगारी इतिहासातील पहिला डॉन म्हणजे वरदराजन मुदलीयार उर्फ वरदाभाई.

The story of dharavi first don varadarajan mudaliar aka Varadabhai | हां, मैं हूँ धारावी का डॉन! वरदराजन मुदलीयार उर्फ वरदाभाईची कहाणी...

हां, मैं हूँ धारावी का डॉन! वरदराजन मुदलीयार उर्फ वरदाभाईची कहाणी...

मनोज गडनीस, विशेष प्रतिनिधी

धारावीच्या गुन्हेगारी इतिहासातील पहिला डॉन म्हणजे वरदराजन मुदलीयार उर्फ वरदाभाई. १९२६ मध्ये जन्मलेल्या वरदाभाईने अवैध धंदे करताना गरिबांसाठी मदत करत धारावीवर आपले वर्चस्व स्थापन केले होते. 

१८८४ च्या दरम्यान निर्माण झालेल्या धारावीमध्ये तेव्हापासून ते आजपर्यंत तेथे सर्वाधिक वास्तव्य दक्षिणेतील लोकांचे आहे. तामिळनाडू, केरळ, आंध्रप्रदेश अशा राज्यांतून आलेले अनेक लोक एकीकडे स्वत:च्या आयुष्याची घडी धारावीत बसवत होते अन् दुसरीकडे आपापसांत संघर्षाच्या घटनाही घडू लागल्या होत्या. त्यामुळे आपापल्या लोकांचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येक दशकात तेथे नवनवीन 'नेतृत्त्व' निर्माण होत गेले. तो 'नेता' आपल्या लोकांची 'सर्वतोपरी' काळजी घ्यायचा आणि दुसरीकडे वाममार्गाने पैसेही कमवत होता. असे कित्येक लोक आजही धारावीत होऊन गेले. पण त्यांची दादागिरी त्यांच्या मोहल्ल्यापुरतीच मर्यादीत होती. धारावी खऱ्या अर्थाने गाजवली आणि आजही ज्याचे नाव केवळ धारावीच नव्हे तर माटुंगा आणि सायन-कोळीवाडा येथेही घेतले जाते ती व्यक्ती धारावीचा पहिला डॉन होती. त्याचे नाव वरदराजन मुदलीयार उर्फ वरदाभाई. 

मुंबईच्या गुन्हेगारी जगताचा इतिहास वरदाभाईच्या नावाशिवाय अपुरा आहे. १९२६ साली तामिळनाडू येथे जन्माला आलेला वरदराजन १९४५ मध्ये मुंबईत आला. काही काळ शाळेत शिक्षण घेतल्यानंतर त्याने रेल्वे स्टेशनवर हमाली सुरू केली. हमाली करतानाच त्याची पावले गुन्हेगारी जगताकडे वळली. सुरुवातीला छोटे-मोठे गुन्हे केल्यानंतर कुख्यात डॉन छोटा राजन याचा गुरू बडा राजन उर्फ राजन माधव नायर याच्या संपर्कात वरदराजन आला आणि तेथून त्याने गुन्हेगारी जगतामध्ये आपले पाय रोवण्यास सुरुवात केली. वरदराजन मध्य मुंबईत सक्रिय होत असतानाच करीमलाला आणि हाजी मस्तान हे डॉन देखील मुंबईत आपले हातपाय पसरत होते. जाणकारांच्या मते, या तिघांमध्ये एकप्रकारचे 'अंडरस्टँडिंग' होते. त्यामुळे त्यांच्यात त्या काळी गँगवॉरसारखे प्रसंग आले नाहीत. स्मगलिंग आणि काळ्या धंद्यातून हाजी मस्तानने निवृत्ती घेतल्यानंतर दाऊद पुढे आला. त्यानंतर दाऊद आणि करीमलाला यांच्या वर्चस्वाची लढाई सुरू झाली. आपापसांतील संघर्षामुळे करीमलाला आणि दाऊद या दोन्ही गँग एकीकडे व्यस्त असतानाच दुसरीकडे वरदराजन काही काळापुरता संपूर्ण मुंबईचा डॉन झाला होता. 

अवैध दारु विक्री, जुगार, वैश्या व्यवसाय, सेटलमेंट असे सारे तो करत होता. १९७४ ते १९७७ तो तुरुंगातही होता. त्याच्या गुन्हेगारी कारवाया वाढत असतानाच गरीब लोकांना नियमित मदत करत असल्यामुळे धारावीत त्याच्याबद्दल मोठ्या प्रमाणावर सहानुभूती होती. त्याच्या साम्राज्याला पहिल्यांदा सुरूंग लावला तो त्या काळी मुंबई पोलिस दलात दबदबा असलेल्या वाय.सी.पवार या अधिकाऱ्याने, त्यांनी वरदराजनच्या सर्व गुन्हेगारी कृत्यांचा पाश इतका आवळला की, शेवटी वरदराजन मुंबईतून पुन्हा तामिळनाडू येथे पसार झाला आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला. 

असं म्हणतात की, वरदराजनचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा खास मित्र हाजी मस्तान याने त्याचा मृतदेह विशेष विमानाने मुंबईत आणला आणि वरदराजनच्या इच्छेनुसार त्याच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. १९८८ मध्ये वरदराजनचा मृत्यू झाला. त्यानंतर धारावीच्या गल्लीबोळात अनेक भाई झाले. मात्र, त्यांच्यापैकी कुणीही वरदराजन होऊ शकला नाही. याचे श्रेय अर्थातच मुंबई पोलिसांचे!

Web Title: The story of dharavi first don varadarajan mudaliar aka Varadabhai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई