दुर्गंधीने श्वास कोंडला, आरोग्यावर परिणाम; देवनार डम्पिंग परिसरातील रहिवाशांची आर्त विनवणी
By सचिन लुंगसे | Updated: March 24, 2025 13:53 IST2025-03-24T13:47:37+5:302025-03-24T13:53:18+5:30
"आम्हाला कचऱ्याचे ढीग नको; शाळा, महाविद्यालये, रुग्णालये द्या"

दुर्गंधीने श्वास कोंडला, आरोग्यावर परिणाम; देवनार डम्पिंग परिसरातील रहिवाशांची आर्त विनवणी
सचिन लुंगसे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे आम्ही आजारी पडत आहोत. त्याच्या विळख्याने मृत्यू झाल्याने आमची कित्येक माणसे आम्हाला सोडून गेली. आमच्या कित्येक पिढ्या कचऱ्यात वाढल्या आणि त्यातच संपल्या. नव्या पिढीसमोर कचरा वाढून ठेवू नका. त्यांना शिक्षणासाठी चांगल्या शाळा, महाविद्यालये, तर उत्तम आरोग्यासाठी रुग्णालये द्या, अशी आर्त विनवणी देवनार डम्पिंग ग्राउंड लगतच्या गोवंडी येथील बैंगनवाडी, शिवाजी नगरमधील रहिवाशांनी केली आहे.
मुंबईचा कचरा महालक्ष्मी, कुर्ला, कांजुरमार्ग आणि देवनार डम्पिंगवर टाकला जातो. शहरातील कचरा सुरुवातीला महालक्ष्मी रेल्वे स्थानकालगतच्या यार्डात आणून नंतर तो कुर्ला डम्पिंगवर आणि तेथून पुढे देवनार डम्पिंगवर टाकला जातो. कांजुरमार्ग डम्पिंग कचऱ्याने फुल्ल होताच कचरा देवनार डम्पिंगवर नेण्यात येतो.
देवनार डम्पिंगवर सध्या आठ मजली इमारतीऐवढा कचऱ्याचा डोंगर आहे. यातून निघाणारा वायू शिवाजीनगर, बैंगनवाडी, गोवंडी, मानखुर्द, चित्ता कॅम्प आणि चेंबूरमधील रहिवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. देवनार डम्पिंगचा सर्वाधिक त्रास बैंगनवाडी आणि शिवाजी नगरमधील रहिवाशांना होत आहे.
१२० हेक्टरवर कचऱ्याचे साम्राज्य
देवनार डम्पिंग १९२७ पासून सुरू असून, ते १२० हेक्टरवर पसरलेले आहे. २०१८-१९ मध्ये येथे मोठ्या प्रमाणावर आगी लागल्या होत्या. अनारोग्यामुळे तेथील रहिवाशांचे आयुष्य ६० वरून ४० पर्यंत घटले आहे. २०२५ पर्यंत हे डम्पिंग बंद केले जाईल, अशी घोषणा करण्यात आली आहे.
राख हवेत मिसळल्यास नव्या समस्या
२००८ मध्ये देवनार व मुलुंड डम्पिंग बंद करण्याचा प्रकल्प पालिकेच्या पातळीवर आखण्यात आला होता. २५ वर्षांत शास्त्रोक्त पद्धतीने डम्पिंग बंद करण्यासाठी पालिकेने या प्रकल्पांसाठी प्रत्येकी साडेचार हजार कोटी रुपये खर्च करण्याची तयारी दर्शविली. कंत्राटदारांचीही नियुक्ती झाली. मात्र, काही कारणास्तव हा प्रकल्प रद्द केला. देवनार आणि मुलुंड डम्पिंगवर कचरा टाकण्यासाठी न्यायालयाने ३० जून २०१७ पर्यंत मुदत दिली होती. त्यामुळे पालिकेने शास्त्रोक्त पद्धतीने प्रकल्प उभारणी सुरू केली. सध्या देवनारमध्ये सुमारे ६०० मेट्रिक टन कचरा जमा होतो. रोज तीन हजार टन कचऱ्यापासून सुमारे २० मेगावॉट वीज निर्मिती केली जाईल. ऑक्टोबरमध्ये प्रकल्प कार्यान्वित करण्याचा प्रयत्न आहे. प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या राखेपासून विटा, रस्ता दुभाजक या वस्तू बनविण्याचे प्रस्तावित आहे. मात्र, राख हवेत मिळसल्यास आरोग्याच्या समस्या निर्माण होतील.
आमचे येथेच पुनर्वसन करा!
धारावी पुनर्विकास प्रकल्पातील अपात्र रहिवाशांचे पुनर्वसन सरकार देवनार डम्पिंगवर करणार आहे. त्याऐवजी शिवाजीनगर, बैंगनवाडी येथील रहिवाशांसाठी डम्पिंगवर संक्रमण शिबिरे बांधावीत. डम्पिंगचा प्रश्न त्यामुळे निघाली निघेल आणि रहिवाशांचा जगण्याचा दर्जा सुधारेल, अशी अपेक्षा गोवंडी न्यू संगम वेल्फेअर सोसायटीचे संस्थापक फय्याज आलम शेख यांनी व्यक्त केली.
महापालिकेच्या १९९१ च्या विकास आराखड्यात डम्पिंगवर उद्याने, मैदाने, रुग्णालय, शाळा, महाविद्यालय आहे. आता २०३४ चा आराखडा येईल. मात्र, १९९१ च्या आराखड्याची अंमलबजावणी झाली नाही. याऐवजी सरकार डम्पिंग बिल्डरांच्या घशात घालून आमच्या जगण्याचा हक्क हिरावत आहे.
प्रभाकरन राजशेखर,
-सचिव, गोवंडीकर फाउंडेशन
गोवंडीला कचऱ्यामुक्त करा. झोपडपट्ट्या नियमित करा. पाच घरांसाठी फक्त एक जलजोडणी मिळते. प्रत्येक घराला स्वतंत्र जलजोडणी द्या. आम्ही स्वच्छ हवेत आणि निरोगी आयुष्य जगू इच्छितो.
इरफान शेख,
-तालुकाध्यक्ष, एमआयएम
आमच्या प्रत्येक श्वासात डम्पिंगचा दर्प जात आहे. वैद्यकीय कचरा जाळण्याच्या प्रकल्पामुळे प्रदूषण वाढले आहे. डम्पिंगच्या दुर्गंधीने आमच्या पिढ्या संपल्या आहेत. मात्र, डम्पिंग बंद केले तर कचरा वेचकांना रोजगार मिळणार नाही, अशी ओरड केली जाते. सरकारने त्यांना रोजगाराच्या नव्या संधी द्याव्यात.
- नफीस अहमद अन्सारी, सदस्य, गोवंडी सिटीझन्स वेल्फेअर फोरम
अस्थमाच्या विळख्यामुळे किती झाले मृत्यू?
वर्ष एम पूर्व मुंबई एम पूर्व (टक्क्यांत)
२०१६ ८५ १,०८० ७.८०
२०१७ १०२ १.१३२ ९
२०१८ १२५ १,१८१ १०.५८
२०१९ ९९ १,१३४ ८.७०
२०२० ९७ १,१२६ ८.६०
२०२१ १११ १,१०४ १०.०५
एकूण ६१९ ६,७७५ ९.१६