Join us  

आषाढीच्या महापूजेनंतर दुसऱ्या दिवशी शिंदे सरकार सत्तेत राहणार नाही, राष्ट्रावादीच्या नेत्याचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2022 2:57 PM

Eknath Shinde Government: शिवसेनेमध्ये मोठी बंडखोरी होऊन सत्तेवर आलेल्या या शिंदे सरकारविरोधात महाविकास आघाडीचे नेते आमदार आक्रमक झालेले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदे सरकारच्या भवितव्याबाबत मोठं विधान केलं आहे.

मुंबई - गेल्या पंधरवड्यामध्ये घडलेल्या धक्कादायक घडामोडींनंतर अखेर राज्यातील ठाकरे सरकार जाऊन भाजपाच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. मात्र शिवसेनेमध्ये मोठी बंडखोरी होऊन सत्तेवर आलेल्या या शिंदे सरकारविरोधात महाविकास आघाडीचे नेते आमदार आक्रमक झालेले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदे सरकारच्या भवितव्याबाबत मोठं विधान केलं आहे. आषाढी एकादशी दिवशी विठुरायाच्या महापूजेनंतर दुसऱ्या दिवशी हे सरकार सत्तेत राहणार नाही, कारण दुसऱ्या दिवशी या प्रकरणाची सुप्रिम कोर्टात सुनावणी होणार आहे, त्यात हे आमदार अपात्र ठरल्यास सर्वकाही समोर येणार आहे.

अमोल मिटकरी शिंदे सरकारच्या भवितव्याबाबत म्हणाले की, यावर्षी विठुरायाची शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार आहेत. पण ही शासकीय महापूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी महापूजा करणाऱ्यांचं सरकार राहणार की जाणार हा एक प्रस्नच आहे. कारण दुसऱ्या दिवशी या सरकारमधील काही बंडखोरांच्या अपात्रतेबाबत सुनावणी होणार आहे. त्यात या आमदारांना कोर्टाने अपात्र ठरवल्यास सर्व काही समोर येईल. देवेंद्र फडणवीसांवर विठुराया का नाराज आहे, हा एक संशोधनाचा विषय आहे, असेही अमोल मिटकरी यावेळी म्हणाले.

दरम्यान, आषाढी एकादशीला एकनाथ शिंदे विठ्ठलाची पूजा करणार आहेत. त्यामुळे हे सरकार शिवसेनेचं आहे की भाजपाचं हे, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट करावं, असा टोलाही त्यांनी लगावला.  

टॅग्स :अमोल मिटकरीएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीस