Join us  

मोनिकाला लावलेला दुसऱ्याचा हात आता करतोय उत्तम काम, राज्यातील हात प्रत्यारोपणाची पहिलीच शस्त्रक्रिया यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 12:50 PM

Monica More: दोन्ही हात रेल्वे अपघातात गमावतात... पाच वर्षाने चेन्नई येथील मेंदूमृत व्यक्तीचे हात मिळाल्यानंतर दोन्ही हातांची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होते. शस्त्रक्रियेच्या दीड वर्षांनंतर त्या हाताच्या आधारे पुनश्च कामाला सुरूवात. एखाद्या चित्रपटातील कहाणी वाटावी, असा प्रवास आहे मोनिका मोरेचा.

- संतोष आंधळेमुंबई : दोन्ही हात रेल्वे अपघातात गमावतात... पाच वर्षाने चेन्नई येथील मेंदूमृत व्यक्तीचे हात मिळाल्यानंतर दोन्ही हातांची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होते. शस्त्रक्रियेच्या दीड वर्षांनंतर त्या हाताच्या आधारे पुनश्च कामाला सुरूवात. एखाद्या चित्रपटातील कहाणी वाटावी, असा प्रवास आहे मोनिका मोरेचा. राज्यातील हाताची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झालेली मोनिका पहिली रुग्ण असून, बहुतेक गोष्टी आता स्वत:च्या हाताने करण्यास तिने सुरूवात केली आहे. सध्या ती ग्लोबल रुग्णालयात रुग्ण समन्वयक या पदावर काम करत आहे. रुग्णांची माहिती घेऊन लॅपटॉपवर त्याच्या नोंदी करणे, प्रत्यारोपणाच्या रुग्णांना समुपदेशन करणे अशी जबाबदारी तिला देण्यात आली आहे.

२०१४ साली रेल्वे अपघातात मोनिका मोरे या तरुणीने दोन्ही हात गमावले होते. २८ ऑगस्ट २०२० रोजी ग्लोबल रुग्णालयात तिच्यावर हात प्रत्यारोपण ही शस्त्रक्रिया करण्यात आली. याकरिता ३२ वर्षीय एका मेंदूमृत व्यक्तीकडून हे हात मिळाले असून, ते चेन्नईवरून येथे आणण्यात आले होते.

अत्यंत अवघड शस्त्रक्रिया हाताचे प्रत्यारोपण ही खूपच अवघड आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया आहे. या शस्त्रक्रियेनंतर काही महिन्यांनी रुग्ण हातांच्या हालचाली फिजिओथेरपीच्या सहाय्याने करू शकतो. खासगी रुग्णालयात हात प्रत्यारोपणाचा खर्च लाखोंच्या घरात असतो. त्यामुळे अनेक रुग्ण प्रत्यारोपण शस्त्रक्रियेपासून दूर राहतात. हाताचे प्रत्यारोपणही करता येऊ शकते, हे फारच कमी लोकांना माहिती आहे.

रेल्वे अपघातात दोन्ही हात गमावल्यानंतर आपल्याला पुन्हा हात मिळतील आणि आपण काम करू शकू, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण आज मी काम करू शकतेय. टॅक्सीने एकटी प्रवास करतेय. सहा महिन्यांपूर्वी रुग्णालयाने विश्वास ठेवून मला नोकरी दिली. फोन उचलणे, दरवाजा ढकलणे, लॅपटॉपवर टायपिंग करणे, चमच्यांच्या सहाय्याने जेवणे आणि झाडू मारणे या गोष्टी आता करत आहे.    - मोनिका मोरे

हाताचे प्रत्यारोपण यशस्वी झाले असून, ती सध्या स्वत:ची कामे करत आहे. तिच्यावर अजूनही फिजिओथेरपीचे उपचार सुरू आहेत. तिच्या हातामध्ये बऱ्यापैकी बळ निर्माण झाले आहे. येत्या काळात मोठी सुधारणा अपेक्षित आहे. आमच्याकडे अजूनही काही रुग्ण हात मिळविण्याच्या प्रतीक्षा यादीवर आहेत.- डॉ. नीलेश सातभाई, प्लास्टिक सर्जन

टॅग्स :आरोग्यमुंबई