Join us
Daily Top 2Weekly Top 5

बोरीवलीतील प्रभागांत नगरसेविकांचे राज्य! ठाकरे बंधूंच्या युतीनंतर मराठी मतांचे काय होणार? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 14:44 IST

सहा प्रभागांत भाजपची उमेदवारी निश्चित झाल्याचे समजते. उद्धवसेना व काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर होणे बाकी आहे.

 

सीमा महांगडे  -

मुंबई : बोरीवली विधानसभेच्या सात प्रभागांपैकी सहा प्रभाग हे यंदा महिलांसाठी आरक्षित आहेत. उर्वरित एक प्रभाग खुल्या गटासाठी आरक्षित आहे. त्यामुळे बोरीवलीत नगरसेविकांचे राज्य असेल. २०१७ च्या पालिका निवडणुकीत सात पैकी पाच प्रभागांत भाजपचे नगरसेवक निवडून आले होते, तर उर्वरित दोन प्रभागांपैकी शिवसेना आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून आला होता. सहा प्रभागांत भाजपची उमेदवारी निश्चित झाल्याचे समजते. उद्धवसेना व काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर होणे बाकी आहे.

बोरीवलीतील महावीर नगर, एक्सर, शिंपोली, वजिरा नाका, गोराई परिसरात मराठी भाषकांबरोबरच गुजराती समाजाची मते वाढली आहेत. बोरिवलीत संजय उपाध्याय भाजपचे आमदार आहेत, तर उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री पीयूष गोयल प्रतिनिधित्व करत आहेत. २०१७ साली काँग्रेसमधून निवडून आलेल्या प्रभाग क्रमांक ९ च्या माजी नगरसेविका श्वेता कोरगावकर यांना प्रभाग क्रमांक १६ मधून, तर प्रभाग क्रमांक ९ मधून शिवा शेट्टी यांना भाजपची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. प्रभाग क्रमांक १८ च्या माजी नगरसेविका संध्या दोशी या उमेदवारीच्या प्रतीक्षेत आहेत.  त्यांनी उद्धवसेनेतून शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. प्रभाग क्रमांक १४, १६ आणि १७ मध्ये आरक्षण कायम असूनही भाजप माजी नगरसेविकांऐवजी नवीन उमेदवारांना संधी देणार असल्याचे समजते. त्यामुळे प्रभाग क्रमांक १६ च्या माजी नगरसेविका आसावरी पाटील यांनी उद्धवसेनेत सोमवारी प्रवेश केला. 

भाजपचा वरचष्मा राहणार?बोरीवलीत गुजराती, राजस्थानी आणि जैन मतदारांची संख्या जवळपास ४० टक्के आहे. तेवढेच मराठी भाषक मतदार आहेत. मात्र, मराठी मतांचा स्वतंत्र प्रभाव येथे दिसून आलेला नाही. 

दक्षिण भारतीय, मुस्लीम आणि उत्तर भारतीय अशा २० ते २५ टक्के मतदारांचा समावेश आहे. विधानसभा, लोकसभेत भाजपला येथून मताधिक्य मिळाले आहे. आता भाजपचा वरचष्मा राहणार की ठाकरे बंधूंच्या युतीमुळे नवीन समीकरणे आकार घेतील, याकडे लक्ष राहणार आहे.

२०१७ च्या महापालिका निवडणुकीतील चित्रप्रभाग    उमेदवार    पक्ष     मते    मतदारसंख्या (२०२५)९    श्वेता कोरगावकर    काँग्रेस    ९,६५४    ४८,५८६ १३    विद्यार्थी सिंग    भाजप    १३,११३    ४२,६०४१४    आसावरी पाटील    भाजप    ८,३२१    ४४,४६९१५    प्रवीण शाह    भाजप    २२,८०७    ५९,८४०१६    अंजली खेडकर    भाजप    ९,४६५    ५१,११११७    बिना दोशी    भाजप    १४,४१४    ५१,१४९१८    संध्या दोशी    उद्धवसेना    ९,८१५    ४५,९३३

 

टॅग्स :मुंबई महापालिका निवडणूक २०२६निवडणूक 2026