सर्वोदयनगर येथील पश्चिम द्रुतगती महामार्ग रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा, वाहतूक कोंडी सुटणार
By मनोहर कुंभेजकर | Updated: January 8, 2025 16:12 IST2025-01-08T16:12:06+5:302025-01-08T16:12:30+5:30
Mumbai News: विकास नियंत्रण नियमावली २०३४ मधील बदलानंतर गोरेगांव (पूर्व) दूधसागर वसाहती जवळील १८.३० मिटर बाधित रस्ता रुंदीकरणाचे काम आता लवकरच सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सर्वोदयनगर येथील पश्चिम द्रुतगती महामार्ग रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा, वाहतूक कोंडी सुटणार
- मनोहर कुंभेजकर
मुंबई - विकास नियंत्रण नियमावली २०३४ मधील बदलानंतर गोरेगांव (पूर्व) दूधसागर वसाहती जवळील १८.३० मिटर बाधित रस्ता रुंदीकरणाचे काम आता लवकरच सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई महानगरपालिकेने याला मंजूरी दिली असून येथे वसलेल्या सर्वोदय नगर मधील निवासी व अनिवासी गाळयांचे सर्वेक्षणाचे कामही लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
मुंबई महानगर पालिकेने सर्वोदयनगर रस्ता रुंदीकरणाच्या प्रस्तावास मंजूरी दिल्याने येथील रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला असून यामुळे मोहन गोखले पथ ते आरे चेकनाक येथे दर दिवशी होणारी वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे शिंदे सेनेचे खासदार रविंद्र वायकर यांनी जनतेच्या मागणीनुसार यासाठी संबंधित यंत्रणाकडे पाठपुरावा केला होता.
सर्वोदय नगर येथे महामार्गाची रुंदी ४५ मिटर आहे. या झोपडपट्टीच्या उत्तरेकडे व दक्षिणेकडे महामार्गाची रुंदी ६१ मिटर आहे. पूर्व व पश्चिम संमत विकास आराखडा २०३४ नुसार सर्वोदय नगर महामार्गाची रुंदी ४१ मिटर असून येथून जाणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. महामार्गाच्या पूर्वेकडील १८.३० मिटर विकास नियोजित रस्ता व दूधसागर सोसायटीचा रस्ता यांच्या एकत्रित जागेला रस्ता रेषा केल्यानंतर महामार्ग रस्त्यांची रुंदी ५६ ते ५८ मिटर रुंदीचे सातत्य राखणे शक्य होणार आहे. यामुळे आरे चेक नाक येथे होणारी वाहतुकीची कोंडी सुटण्यास मदत होणार असून येथील प्रवास जलद गतीने करणे शक्य होणार आहे.
हा रस्ता रुंद करण्यासाठी खासदार रवींद्र वायकर यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न व लक्षवेधीच्या माध्यमातून विधानसभेचे लक्षही वेधले होते. या ठिकाणी सर्वोदय नगर वसाहत असून येथे निवासी व अनिवासी मिळून अंदाजे ३०० गाळे आहेत. या गाळयांचे सर्वेक्षण करून त्यांचे पुनर्वसन जवळच करण्यात, यावे अशी भूमिका त्यांनी मांडली होती.