Join us
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज फेडण्यासाठी रेशन दुकादाराने केली तांदूळ, गव्हाची 'ब्लॅक मार्केटिंग'!

By गौरी टेंबकर | Updated: January 30, 2024 16:22 IST

शिधा जिन्नसांचा अपहार करत त्याने गोरगरीब जनतेला यापासून वंचित ठेवून शासनाचीही दिशाभूल केल्याचे उघड झाले आहे.

मुंबई: कर्ज फेडण्यासाठी गोरगरिबांच्या हक्काचे असलेले रेशनवरील लाखो रुपयांचे तांदूळ गहू काळ्या बाजारात विकल्याचे एका रेशन दुकानदाराने शिधावाटप कार्यालय अधिकाऱ्यांना सांगितले आहे. त्याच्या विरोधात त्यांनी कांदिवली पोलिसात तक्रार दिल्यावर आरोपी रणछोड बाऊ अनवाडीया (५२) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

कांदिवली पश्चिम परिसरात असलेल्या शिधावाटप कार्यालय क्रमांक २८ ग चे सहायक शिधावाटप अधिकारी अजित कासारे यांनी २९ जानेवारी रोजी लालजी पाडा परिसरात असलेले मे रोहित कंजूमर सोसायटी या दुकानाला त्यांच्या पथकासह भेट दिली. दुकानातील प्रमुख रणछोड याच्याकडे त्यांनी  साठे पुस्तक, भेट वही तक्रार वही विसरलेल्या शिफ्ट ची नोंदवही दक्षता समिती सदस्य नोंदवही आणि पॉज मशीन याची मागणी केली. जी आरोपीने त्यांना उपलब्ध करून दिली. मात्र  शिधा जिन्नसांची मोजणी केल्यावर त्यात १ लाख ६६ हजार ४७५ रुपयांचा गहू आणि १ लाख २९ हजार ८४२ रुपयांचा तांदूळ मिळून २ लाख ९६ हजार ३१८ रुपयांचे धान्य कमी आढळले.  

शिधा जिन्नसांचा अपहार करत त्याने गोरगरीब जनतेला यापासून वंचित ठेवून शासनाचीही दिशाभूल केल्याचे उघड झाले आहे. त्याला झालेले कर्ज फेडण्यासाठी त्याने ही काळाबाजारी केल्याचे कबूल केल्या नंतर रणछोडविरोधात कासारे यांनी तक्रार दिली. त्यानुसार कांदिवली पोलिसांनी अत्यावश्यक वस्तू अधिनियमनचे कलम १०, ३, ७, ८ आणि ९ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई सुरू आहे. 

टॅग्स :धोकेबाजीमुंबईगुन्हेगारी