योगेश कदम, गृह राज्यमंत्री |
नाटकांची मला आवड आहे. मी शाळेत असताना एकांकिकेत काम केले होते. मी बोरीवलीच्या नामदार गोपाळ कृष्ण गोखले हायस्कूलमध्ये होतो. तिथे आमच्या मुकणे मॅडम एकांकिका बसवायच्या आणि आम्ही स्पर्धेत भाग घ्यायचो. नाटकाची आवड तेव्हापासूनची. आजही नाटक पाहतो, मागील वर्षभरात मात्र नाटक बघायला जाता आले नाही. पण वेळ मिळेल तेव्हा जाईनच. 'सही रे सही' मी सहावेळा पाहिले. भरत जाधव आणि प्रशांत दामले हे माझे आवडते कलाकार.
मला भारतात आणि परदेशातही फिरायला आवडते. वर्षातून तीनवेळा तरी मी देशात किंवा परदेशात फिरायला जातोच. मला दोन वर्षांचा मुलगा आणि सहा वर्षाची मुलगी आहे. त्यांच्यासह मी परदेशात जातो. ग्रीस आणि क्रोएशिया हे देश मला प्रचंड आवडले. ग्रीसचा इतिहास, तिथली युद्धे आणि युद्धानंतर उभा राहिलेला देश यादृष्टीने ग्रीस आवडतो. भारतात काश्मीर आणि राजस्थान मला आवडते. काश्मीरचा जो भाग पर्यटकांसाठी पूर्वी खुला नव्हता अशा भागात काही महिन्यांपूर्वीच मी जाऊन आलो. मला नेहमी नवीन ठिकाणी जायला आवडते. मी मेजर फूडी असल्याने नवनवीन पदार्थ चाखतो. ज्या देशात मी जातो तेथील स्थानिक पदार्थच खातो. मराठी खाद्यपदार्थामध्ये पिठलं-भाकर आणि मिसळ मला आवडते.
वेगवेगळे बूट आवडतातमी साधेच कपडे घालतो. मतदारसंघात असलो की डेनिम आणि साधा शर्ट घालतो. मित्रांसोबत असलो की माझे आवडता टी-शर्ट घालतो. मला बुटांची आवड असल्याने वेगवेगळे बूट मात्र वापरतो.
मुलीचा बाप झालो तो सर्वांत महत्त्वाचा क्षणमाझी मुलगी रुद्राईचा जन्म झाला, मी बाप झालो तो दिवस माझ्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे. मुलगी आणि वडील यांचे एक वेगळेच नाते असते.
मंत्री झाल्यापासून व्यायामासाठी कमी वेळ मिळतोमला व्यायामाची आवड आहे. जवळपास सलग ११ वर्षे मी व्यायाम करतो आहे, पण मंत्री झाल्यापासून धावपळीमुळे त्याकडे दुर्लक्ष झाले. आठवड्यातून किमान तीन दिवस एक ते दीड तास व्यायामासाठी देता येईल, असे वेळापत्रक बसवतो. माझ्या मतदारसंघात आजोळी आणि मूळ गावी या दोन्ही घरांत मी जिम तयार केली आहे. आता लवकरच पुन्हा व्यायाम सुरू करणार आहे.
कोकणात समुद्रकिनारी हव्या चेंजिंग रूमकोकणाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपण बदलला पाहिजे. काही देशांची अर्थव्यवस्था पर्यटनावर चालते. कोकणात ती क्षमता आहे. कोकणाला त्यादृष्टीने सक्षम करायचे असेल तर मूलभूत सुविधा देणे गरजेचे आहे. आपल्याकडे बीचवर चेंजिंग रूम नसते. ही अगदी मूलभूत गोष्ट आहे. अगदी अशा लहान गोष्टींपासून आपल्याला सुरुवात करायची आहे. ग्रामविकास विभागाकडून कोकण ग्रामीण पर्यटनासाठी निधी दिला जातो, त्या माध्यमातून मी कोकणातील पर्यटनस्थळांचा मूलभूत विकास करण्यास सुरुवात केली आहे.
कुटुंबातील निर्णय एकत्र बसूनवडीलधारी म्हणून कुटुंबातील आणि राजकारणातील आमचे निर्णय वडील रामदास भाईच घेतात. परंतु माझे कुटुंब म्हटले की 'सौ'चेच चालते. कुठल्याही कुटुंबात चालते ते 'सौ'चेच. जे म्हणतात माझे चालते ते खोटे बोलत असतात. मोठा निर्णय घ्यायचा असेल तर कुटुंबातील सगळे एकत्र बसून चर्चा करतो आणि मग निर्णय घेतो.
(शब्दांकन : दीपक भातुसे)