Join us

जुन्या आग्रा महामार्गावर वाहनांचा वेग कासवगतीने; कोंडीमुळे काही मिनिटांच्या प्रवासासाठी पाऊण तास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 05:47 IST

सांताक्रूझ चेंबूर पुलाखाली वाहतूक पोलिस चौकी असूनही बेशिस्त वाहनचालकांना आळा बसत नाही.

मुंबई : मुंबई आणि ठाण्याला जोडणारा जुना आग्रा रोड म्हणजे एलबीएस मार्ग सायनपासून घाटकोपर येथील सर्वोदय परिसरापर्यंत कायमच कोंडीत असतो. गर्दीच्या वेळी काही मिनिटांच्या अंतरासाठी अर्धा ते पाऊण तास लागतो, अशी स्थिती आहे.

एलबीएस मार्गावर नारायणनगर, चिराग नगर परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूला अवजड वाहने, रिक्षांची अनधिकृत पार्किंग असते. त्यामुळे चालण्यास जागा शिल्लक राहत नाही. कमानी सिग्नलवर वाहतूक चौकी असूनही, कायमच हा परिसर कोंडीत अडकून पडलेला असतो. कमानी ते बैलबाजार पोलिस चौकीपर्यंतच्या मार्गावर उलट्या दिशेने येणाऱ्या वाहनांमुळे काजूपाडा जोड रस्त्यावर मध्यरात्री १२.३० वाजताही कोंडी असते. मगन नथुराम रस्त्यावर भरबाजारात अवजड वाहने उभी असल्याने रस्ता अरुंद होतो आणि कोंडी असते. सांताक्रूझ चेंबूर पुलाखाली वाहतूक पोलिस चौकी असूनही बेशिस्त वाहनचालकांना आळा बसत नाही. दरम्यान, मायकल शाळेपासून कमानी सिग्नलपर्यंत मायकल शाळेच्या बससोबतच अवजड वाहने उभी असतात. त्यामुळे शाळा सुटताना आणि भरताना मोठी कोंडी होते. 

वाहतूककोंडीच्या तापाची कारणे काय?कुर्ला डेपोपासून कल्पना सिनेमापर्यंत फुटपाथवर भंगार विक्रेत्यांनी कब्जा केला असून, फुटपाथवरही त्यांची कामे सुरू असतात. त्यामुळे नाइलाजाने प्रवाशांना रस्त्यावरून चालावे लागते. सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड पुलाखालील वाहतूक पोलिस चौकीपासून कुर्ला पश्चिमेकडील बुद्ध कॉलनीपर्यंत पिकअवरला कोंडी असते. बेशिस्त वाहन चालक आणि अनधिकृत पार्किंगचा फटका बसतो. एलबीएसला लागून असलेल्या खाऊ गल्लीत रात्री दीड वाजेपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुचाकी वेड्यावाकड्या पद्धतीने उभ्या केल्या जातात. त्यामुळे रात्री ७ वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत खाऊ गल्ली कायम कोंडीत असते.अंधेरी-कुर्ल्याला जोडणाऱ्या रस्त्यावर जरीमरी, बैलबाजार या रस्त्यावर सकाळ, संध्याकाळ कोंडी असते. अरुंद रस्ता, अवजड वाहनांचे अनधिकृत पार्किंग येथील मोठी समस्या असून, गेल्या कित्येक वर्षांपासून असलेली कोंडी यंत्रणेला फोडता आलेली नाही.

टॅग्स :वाहतूक कोंडी