पुढे कसाब उभा असताना जीवाची बाजी लावून २० गर्भवतींना वाचविणारी नर्स म्हणते...
By संतोष आंधळे | Updated: April 11, 2025 12:27 IST2025-04-11T12:27:31+5:302025-04-11T12:27:49+5:30
दहशतवादी अजमल कसाब आणि त्याचा साथीदार अबू इस्माईल यांनी कामा रुग्णालयात प्रवेश करत अंदाधुंद गोळीबार केला होता.

पुढे कसाब उभा असताना जीवाची बाजी लावून २० गर्भवतींना वाचविणारी नर्स म्हणते...
संतोष आंधळे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : आजही २६/११ ही तारीख आठवली तरी अंगावर काटा उभा राहतो. या हल्ल्याच्यावेळी २० गर्भवतींना सुरक्षित ठेवल्याचे समाधान वाटते. अजमल कसाबची ओळख पटविण्यासाठी कोर्टात बोलावले तेव्हा त्याला मी ओळखले होते. त्यावेळी तो हसून म्हणाला होता, मॅडम आपने सही पहचाना, मै अजमल कसाब हू. त्याचे हास्य पाहून तळपायाची आग मस्तकात गेली होती. कामा रुग्णालयातील नर्स अंजली कुलथे तो प्रसंग सांगताना चीड व्यक्त करीत होत्या. त्याचवेळी या हल्ल्याचा मास्टरमाइंड राणाला भारतात आणल्याचा आनंद व्यक्त करीत होत्या. त्याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. दहशतवादी अजमल कसाब आणि त्याचा साथीदार अबू इस्माईल यांनी कामा रुग्णालयात प्रवेश करत अंदाधुंद गोळीबार केला होता.
दहशतवादी समोरून येत होते अन्...
वॉर्डमध्ये २० गर्भवती महिला होत्या. दोन अतिरेकी वाॅर्डाच्या दिशेने येत असताना त्यांनी कुलथे यांना पाहिले. त्यांनी प्रसंगावधान दाखवून वॉर्डचा वजनदार दरवाजा लावून घेतला आणि गर्भवती महिलांना दहा बाय दहा आकार असलेल्या पॅन्ट्रीच्या खोलीत हलविले होते. कुलथे यांनी सांगितले की, माझ्या सोबत असणाऱ्या एका गर्भवती महिलेला अचानक कळा सुरू झाल्या होत्या; पण लेबरचा वॉर्ड तिसऱ्या मजल्यावर होता. त्या महिलेची प्रसूती करण्यासाठी डॉक्टरांची गरज भासणार होती.
डॉक्टरांना फोन करून कळविले तर त्या अशा परिस्थितीत खाली येण्यास तयार नव्हते. मग त्या महिलेला धीर देऊन मी तिला जिन्याने घेऊन लेबर वॉर्डमध्ये सोडून पुन्हा वॉर्डमध्ये आले. या घटनेनंतर रुग्णालयात उपस्थित असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना मानसिक आजाराचा सामना करावा लागला होता. डिसेंबर २०२२ मध्ये न्यूयॉर्क येथे जागतिक दहशतवादविरोधी दृष्टिकोन या विषयावर परिषद भरविली होती. त्यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घटनेची माहिती त्यांनी दिली होती.