डिजिटल युगातील ग्राहकांसाठी प्रभावी जागतिक संरक्षण यंत्रणेची गरज - ॲड. शिरीष देशपांडे
By मनोहर कुंभेजकर | Updated: July 8, 2025 19:02 IST2025-07-08T19:02:11+5:302025-07-08T19:02:26+5:30
संयुक्त राष्ट्र व्यापार परिषदेच्या संशोधन व्यासपीठावर मांडली भूमिका

डिजिटल युगातील ग्राहकांसाठी प्रभावी जागतिक संरक्षण यंत्रणेची गरज - ॲड. शिरीष देशपांडे
मुंबई-संयुक्त राष्ट्रांच्या ग्राहक संरक्षण मार्गदर्शक तत्वांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई ग्राहक पंचायतीच्या २०१२ ते २०१५ मधे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे संयुक्त राष्ट्रांत जिनिव्हा येथे एक कायमस्वरूपी यंत्रणा निर्माण करण्यात आली, ही गेल्या चाळीस वर्षांतील जागतिक स्तरावरील ग्राहक संरक्षणाच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची घटना आहे असे प्रतिपादन मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष ॲड. शिरीष देशपांडे यांनी काल जिनिव्हा येथे संयुक्त राष्ट्रांच्या पंचवार्षिक ग्राहक संरक्षण परिषदेत बोलताना केले.
संयुक्त राष्ट्र ग्राहक संरक्षण मार्गदर्शक तत्त्वांना ४० वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून त्यांच्या जागतिक प्रभावाचा मागोवा घेऊन त्यावर अभ्यासक आणि जगातील धोरणकर्त्यांसमोर भाष्य करण्यासाठी देशपांडे यांना संयुक्त राष्ट्र व्यापार व विकास संघटनेच्या (अंक्टाडच्या) संशोधन व्यासपीठाने निमंत्रित केले होते.
संयुक्त राष्ट्रांच्या या ग्राहक संरक्षण मार्गदर्शक तत्वांमुळे गेल्या चाळीस वर्षांत भारतासह जगातील अनेक प्रगतीशील आणि अप्रगत देशांनी आपापल्या देशांत ग्राहक संरक्षण कायदे अंमलात आणले असल्याचे सांगत देशपांडे यांनी २०१६ पासून या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या या अनोख्या यंत्रणेने गेल्या नऊ वर्षांत केलेल्या कार्याचा धावता आढावा घेत ही व्यवस्था जागतिक स्तरावर गेम चेंजर ठरल्याचे गौरवोद्गार काढले.
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन बाबतही थोडक्यात माहिती देऊन इतर देशांनी त्याचे अनुकरण करण्यासारखे आहे असेही त्यांनी उपस्थित प्रतिनिधींना यावेळी सांगितले.मात्र इ कॉमर्स आणि एआय सारख्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे ग्राहकांच्या सोयीसुविधांमधे भर पडत असली तरी सर्वसामान्य ग्राहक आजच्या या डिजिटल युगात अधिकाधिक असुरक्षित आणि संभ्रमीत झालेला दिसून येतो असे निदर्शनास आणून ग्राहकांच्या वाढत्या फसवणूकींबाबत आणि वाढत्या तक्रारीबाबत अत्यंत प्रभावी आणि सक्षम अशी जागतिक स्तरावर ऑनलाईन तक्रार निवारण यंत्रणा असावी अशी मागणी सुध्दा देशपांडे यांनी याप्रसंगी बोलताना केली.