Join us

सेवेप्रति आपण जेवढे कृतज्ञ राहू, तेवढी जीवनात भरभराट होईल; श्री प्रल्हाद दादा पै यांचा संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 06:20 IST

हजारो नामधारकांच्या उपस्थितीत अमृत महोत्सव सोहळा

मुंबई : जीवनात आपल्याकडून सद्गुरुंची सेवा घडते आहे, ही खूप मोलाची गोष्ट आहे. जीवनात कायमच कृतज्ञ राहून, सेवेला अर्पण केले पाहिजे. जेवढे आपण कृतज्ञ राहू, तेवढी आपल्या हातून अधिक सेवा घडेल. तुमच्या सेवेत जेवढी कृतज्ञता असेल तेवढी तुमच्या जीवनाची भरभराट होईल, असा संदेश सद्गुरु श्री वामनराव पै यांचे सुपुत्र आणि जीवनविद्या मिशनचे आजीव विश्वस्त श्री प्रल्हाद दादा वामनराव पै यांनी दिला.

जीवनविद्या मिशनने गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त दि. १० जुलै रोजी नामधारकांच्या उपस्थितीत श्री प्रल्हाद दादा पै यांचा अमृतमहोत्सव साजरा केला. श्री सद्गुरू वामनराव पै यांच्या ‘एकमेव-जनमनाचा असामान्य शिल्पकार’ या सद्गुरू चरित्राच्या मुखपृष्ठाचे अनावरण करण्यात आले. श्री प्रल्हाद दादा पै यांच्यावरील ‘कृतज्ञ तू कृतार्थ तू’ या पुस्तकाचेही प्रकाशन करण्यात आले. प्रल्हाद दादा पै यांनाअमृत वंदना देण्यात आली.

लोकमतचे समूह संपादक विजय बाविस्कर, श्रीनगरच्या आयकर आयुक्त वंदना मोहिते, ‘लोकमत’ समूहाचे वरिष्ठ उपाध्यक्ष (वितरण) वसंत आवारे, अंकित काणे, संजीव नाईक, गोपाळ शेट्टी, भाई गिरकर, डॉ. सुरेश हावरे, डॉ. प्रसाद प्रधान, सुलेखनकार अच्युत पालव, दिग्दर्शक अशोक हांडे, अभिनेते शरद पोंक्षे, अभिनेत्री ऐश्वर्या नारकर, नाईक वेल्थच्या संचालक पायल नाईक आणि नीलेश जाधव आदी उपस्थित होते.

प्रल्हाद दादा तरुणांचे मेंटॉरश्री प्रल्हाद दादा पै यांना दीर्घायुष्य लाभो, अशी प्रार्थना करत लोकमतचे समूह संपादक विजय बाविस्कर यांनी प्रल्हाद पै यांना लोकमत आणि दर्डा कुटुंबीयांकडून शुभेच्छा दिल्या. लोकमत, सद्गुरू आणि प्रल्हाद दादा याचे ॠणानुबंध अनोखे आणि अनुपम आहेत. राष्ट्रहित आणि विश्वशांती हे आमचे समानसूत्र आहे. ‘लोकमत’च्या ‘महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर’ या पुरस्कार सोहळ्यात प्रल्हाद दादा पै यांना समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते. ‘लोकमत’च्या धर्म परिषदेतही प्रल्हाद दादा सक्रिय सहभागी झाले होते. सद्गुरु आणि प्रल्हाद दादा पै यांचे सकारात्मक ऊर्जा देणारे संदेश लाख मोलाचे आहेत. प्रल्हाद दादा तरुणांच्या गळ्यातील ताईत, मेंटॉर आहेत. जीवन विद्या मिशनचे निस्पृह कार्य प्रल्हाद दादा समर्पण भावनेने पुढे नेत आहेत. 

सँड आर्टने मानवंदनासंत ज्ञानेश्वर माउलींच्या हरिपाठाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. पंच्याहत्तरीनिमित्त नितेश भारती यांनी साकारलेल्या वाळू शिल्पाच्या (सँड आर्ट) माध्यमातून मानवंदना देण्यात आली, तर शरद पोंक्षे आणि अच्युत पालव यांनी मनोगत व्यक्त केले. 

टॅग्स :प्रल्हाद पै