परमेश्वराने बनवलेली उत्कृष्ट कलाकृती म्हणजे स्त्री; 'वॉकथॉन'मध्ये चित्रा वाघ यांचे कौतुकोद्गार

By मनोहर कुंभेजकर | Published: March 11, 2024 06:50 PM2024-03-11T18:50:14+5:302024-03-11T18:50:35+5:30

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून गोरेगावमध्ये मॅरेथॉनचे आयोजन

The masterpiece created by God is woman; Chitra Wagh's praise in 'Walkathon' | परमेश्वराने बनवलेली उत्कृष्ट कलाकृती म्हणजे स्त्री; 'वॉकथॉन'मध्ये चित्रा वाघ यांचे कौतुकोद्गार

परमेश्वराने बनवलेली उत्कृष्ट कलाकृती म्हणजे स्त्री; 'वॉकथॉन'मध्ये चित्रा वाघ यांचे कौतुकोद्गार

मनोहर कुंभेजकर, मुंबई-आता प्रत्येक दिवस हा महिलांचाच आहे. पुरुषांनी कितीही सांगितले तरी त्यांचे महिलांशिवाय काहीच होत नाही. परमेश्वराने बनवलेली ही उत्कृष्ठ कलाकृती असून स्त्रीला घडवण्यासाठी परमेश्वराने बरेच परिश्रम घेतले आहेत,असे सांगत भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पुरुषांना जे दिसते,त्याही पलिकडे पाहण्याची दृष्टी ही स्त्रीकडे असल्याचे सांगितले. सृजनाला घडवण्याची ताकद महिलांमध्येच असून एकप्रकारे महिलांमध्ये एक सुपर पॉवर असल्याचे कौतुकोद्गार त्यांनी गोरेगाव येथील आयोजित महिलांच्या वॉकथॉन दरम्यान कार्यक्रमांत महिलांना संबोधित करताना काढले.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून गोरेगावमधील प्रभाग क्रमांक ५२च्या माजी नगरसेविका प्रिती सातम यांनी साडी नेसून वॉकथॉन हा मराठमोळा कार्यक्रम खास महिलांसाठी आयोजित केला होता. नारी शक्तीला वंदन करण्यासाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमांत तब्बल ३३६ महिलांनी सहभाग घेतला. याप्रसंगी प्रेमाची गोष्ट मालिकेतील मुक्ताच्या आईची भूमिका करणाऱ्या चित्रपट कलावंत शुभांगी गोखले उपस्थित होत्या. 

 या कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांशी संवाद साधताना चित्रा वाघ म्हणाल्या की,आपले आरोग्य, तंदुरुस्तीसाठी हा कार्यक्रम आयोजित करताना आपली संस्कृतीही जपण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आपला केवळ एक  दिवस नसतो तर ३६५ दिवस हे आपलेच असतात असे त्यांनी ठामपणे सांगितले.

मातृशक्तीला ताकद देण्याचे बळ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून केले जात असून हे वॉकथॉन स्वास्थ तसेच आरोग्यासाठीच नाही तर देशाच्या एकतेसाठी, प्रगतीसाठी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधानांनी महिलांसाठी अनेक योजना आणल्या आहेत. नवीन महिला धोरणामध्ये वडिलांच्या नावासोबत आईचेही नाव मुलाच्या नावापुढे लागणार आहे. आदिवासी पाड्यांसह अनेक भागांमधील मुलांची शाळांमधील हजेरी शंभर टक्के वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे साडीमध्ये हे वॉकथॉन आयोजित करून एकप्रकारे आपली संस्कृती जपण्याचे काम आपण सर्वांनी केले आहे,असे सांगत त्यांनी सर्व सहभागी आणि उपस्थित महिलांचे कौतुक केले.

 माजी नगरसेविका प्रिती सातम यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला धोरण जाहीर केल्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानून रोजच्या धकाधकीच्या जीवनातून महिलांना दोन क्षण आपल्यासाठी देता यावेत यासाठी या वॉकथॉनचे आयोजन केल्याचे सांगितले. साडी नेसून धावण्याचा एक वेगळाच प्रयत्न आणि त्यातून एक वेगळाच आनंद देण्याचा हा प्रयत्न होता,असे सातम यांनी स्पष्ट करत चित्रा वाघ, शुभांगी गोखले यांनी आयोजनासाठी मेहनत करणारी संस्था आणि उपस्थित सर्व महिलांचे आभार मानले.

Web Title: The masterpiece created by God is woman; Chitra Wagh's praise in 'Walkathon'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.