Join us

पालिकेच्या कचरा वर्गीकरण केंद्राची जागा व्यापाऱ्याला दिली भाड्याने, कार्यालयावर मनसेची धडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 16:53 IST

मनोहर कुंभेजकरमुंबई -पालिका प्रशासनाचा अजब कारभार मनसेने आज चव्हाट्यावर आणला आहे. पालिकेच्या जी दक्षिण विभागातील आशिष इंडस्ट्रीज येथील ...

मनोहर कुंभेजकर

मुंबई-पालिका प्रशासनाचा अजब कारभार मनसेने आज चव्हाट्यावर आणला आहे. पालिकेच्या जी दक्षिण विभागातील आशिष इंडस्ट्रीज येथील कचरा वर्गीकरण केंद्राची जागा एका व्यापाऱ्याला गोडाऊन साठी भाड्याने देण्यात आली! त्यामुळे संतप्त मनसेने सदर जागा व्यापाऱ्याला कशी काय भाड्याने देण्यात आली असा सवाल करत सदर व्यापाऱ्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी मनसेने आज पालिकेच्या जी दक्षिण कार्यालयावर धडक मारली.

दादर आशिष इंडस्ट्रीज येथील कचरा वर्गीकरण केंद्राची जागा भाड्याने देण्यात आलेल्या व्यापाऱ्यावर कारवाई करावी अशा मागणीसाठी मनसेचे माहीम विधानसभा विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्त्यांनी आज जी दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला.यावेळी व्यापारी, सामाजिक संस्था आणि घनकचरा विभागचे अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन सहाय्यक आयुक्ताना देण्यात आले.

पालिकेच्या वतीने आकांशा या बचत गटाला ती जागा दहा वर्षाच्या करारावर देण्यात आली होती. मात्र या सामाजिक संस्थेने परस्पर ती जागा एका व्यापाऱ्याला भाडे तत्वावर त्याचे सामान ठेवण्यासाठी  घनकचरा विभागाने दिली असा आरोप किल्लेदार यांनी केला. मनसेचे शाखा अध्यक्ष उमेश गावडे, लक्ष्मण पाटील जयवंत किल्लेदार यांनी मालाचे लोडींग सुरु असतानाचे त्याठिकाणाचे चित्रीकरण करून ही बाब उघडकीस आणल्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिले होते.

तरीदेखील संबंधित पालिकेचे घनकचरा अधिकारी व्यापारी आणि सामाजिक संस्था यांच्यावर अद्याप कोणतीच कारवाई अथवा गुन्हा दखल झालेला नाही त्यामुळे पालिका अधिकारी यांना पाठीशी घालत आहेत का? पोलीस एफआय आर घेण्यास टाळाटाळ करीत आहेत का असा प्रश्न मनसेने पत्रद्वारे उपस्थित केला आला.संबंधितांवर त्वरित कारवाई केली नाही तर आम्ही मनसे स्टाईलने अधिक तीव्र आंदोलन करू असा इशारा किल्लेदार यांनी यावेळी दिला.

टॅग्स :मुंबई