Join us
Daily Top 2Weekly Top 5

मालवणीच्या त्या ३०० घरांचा प्रश्न मार्गी लागणार; महापालिकेने ठोस पावले उचलण्याचे पालक मंत्र्यांचे निर्देश 

By मनोहर कुंभेजकर | Updated: June 16, 2025 15:57 IST

गेल्या काही वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित होता आणि या कुटुंबांचा सातत्याने संघर्ष सुरू होता. मुंबई महानगरपालिकेने घरे खाली करण्यास सांगितले होते.

- मनोहर कुंभेजकर

मुंबई-मालाड पश्चिम येथील मालवणी १ नंबर ते ६ नंबरमधील साने गुरुजी वसाहतीत (बीएमसी कॉलनी) राहणाऱ्या आणि महानगरपालिकेचे कर्मचारी असणाऱ्या मराठी बहुल ३०० कुटुंबांच्या घरांचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

गेल्या काही वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित होता आणि या कुटुंबांचा सातत्याने संघर्ष सुरू होता. मुंबई महानगरपालिकेने घरे खाली करण्यास सांगितले होते. इतकेच नव्हे तर या वसाहतीमधील अनेक सेवा-निवृत्त कर्मचाऱ्यांची देयके (पीएफ इ.) अजूनही पालिकेने दिलेली नाहीत.त्यामुळे येथील रहिवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

यासाठी मुंबई भाजप सचिव विनोद शेलार यांनी गेली ४ वर्षे पालिकेकडे पाठपुरावा केला.आमचे महायुतीचे सरकार आल्यानंतर मी स्वतः पुढाकार घेऊन राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार  यांच्याकडे पाठपुरावा करून या संदर्भात एक संयुक्त बैठक आयोजित केली होती. मालवणीतील विशेषतः या मराठी कुटुंबांना हक्काचे घर मिळवून देण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती त्यांनी दिली.

या बैठकीला पालिकेच्या मालमत्ता विभागाचे उपायुक्त संजोग कबरे व परिमंडळ ४ च्या उपायुक्त डॉ.भाग्यश्री कापसे उपस्थित होत्या. यापूर्वी १९९० च्या आसपास मालवणीतील १२०० कुटुंबांना महापालिकेने मालकी तत्वावर घरे दिली होती त्याच धर्तीवर या ३०० कुटुंबांना त्यांच्या हक्काची घरे मिळावीत अशी आग्रही मागणी आम्ही बैठकीत केली. याला पालकमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत महापालिकेस ठोस पावले उचलण्याचे निर्देश दिले.

या संपूर्ण बीएमसी कॉलनीच्या पुनर्विकासाचा निर्णय महापालिकेने घेतला असून लवकरात लवकर हे काम मार्गी लागणार आहे. या कुटुंबांना घरे मिळावीत यासाठी आवश्यक तो मार्ग शोधण्याचे आश्वासन पालिकेने दिले. त्यामुळे या ३०० कुटुंबांसह इतर रहिवाश्यांना सुसज्ज व मोठी घरे मिळणार असल्याचे विनोद शेलार यांनी सांगितले.

गेल्या १६ वर्षांपासून प्रलंबित असलेला घरांचा हा प्रश्न अखेर मार्गी लागल्यामुळे रहिवाश्यांनी समाधान व्यक्त केले. या बैठकीला दीपक कांबळे, जॉन डेनिस, प्रमोद वैती, प्रीती गाडगीळ, धनंजय गुप्ता आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :आशीष शेलार