पुनर्विकासाचे दाहक सामाजिक वास्तव
By मनोज गडनीस | Updated: October 13, 2025 10:25 IST2025-10-13T10:24:04+5:302025-10-13T10:25:20+5:30
आपण दक्षिण मुंबईपासून उपनगरापपर्यंत टप्प्याटप्प्याने पाहण्यास सुरुवात केली तर ते वास्तव आपल्याला प्रकर्षाने जाणवेल.

पुनर्विकासाचे दाहक सामाजिक वास्तव
मनोज गडनीस, विशेष प्रतिनिधी
दक्षिण मुंबईपासून ते मुंबईच्या उपनगरापर्यंत मुंबईत ४४ हजार घरांच्या पुनर्विकासाची कामे वेगाने सुरू आहेत. येत्या दोन ते पाच वर्षांच्या कालावधीत मुंबईकरांना त्यांच्या जीर्ण घरांतून नव्या घरांमध्ये प्रवेश करता येणार आहे. ही त्यांच्यासाठी आनंदाची गोष्ट असली तरी पुनर्विकासाच्या दरम्यान त्यांच्या सामाजिक आयुष्याची वीण मात्र काहीशी उसवली गेल्याचे वास्तव आहे. आपण दक्षिण मुंबईपासून उपनगरापपर्यंत टप्प्याटप्प्याने पाहण्यास सुरुवात केली तर ते वास्तव आपल्याला प्रकर्षाने जाणवेल.
आज दक्षिण मुंबईत प्रामुख्याने गिरगाव परिसरातील १०० वर्षांपेक्षा जुन्या अशा अनेक चाळींचा क्लस्टर डेव्हलपमेंटअंतर्गत विकास होत आहे. या चाळींतील अनेक कुटुंबे तिथेच जन्माला आली. तिथेच वाढली आणि काही पिढ्यांनी तिथेच अखेरचा श्वास देखील घेतला. आज त्या चाळींचा पुनर्विकास होत असताना किमान ५० ते ७० वर्षे चाळीत सहजीवन जगलेली कुटुंबे आता विखुरली आहेत. मुंबईच्या चाळींतील लोकजीवन म्हणजे रात्री झोपताना केवळ घराच्या दरवाजाची कडी लावली जायची. अन्यथा सकाळपासून रात्रीपर्यंत सताड दरवाजे खुले. सताड दरवाजे खुले याचा अर्थ हे दरवाजे प्रत्येक कुटुंबाच्या सुख-दुःखासाठी खुले असायचे. आता पुनर्विकासानिमित्त ही कुटुंबे विखुरल्याचा मोठा मानसिक आघात या चाळींत राहणाऱ्या आणि आज ज्येष्ठ नागरिक असलेल्या व्यक्तींना बसण्यास सुरुवात झाली आहे.
आता मध्य मुंबईच्या दिशेने आपण आलो, तर बीबीडी चाळींचा पुनर्विकास ही एक उत्तम घटना घडताना दिसत आहे. मात्र, इथे एक वेगळीच सामाजिक समस्या निर्माण होऊ पाहत आहे. एकाचवेळी पाच-सातशे कुटुंबांना चाळ सोडावी लागत आहे आणि त्यांना विकासकातर्फे पंचवीसएक हजारापर्यंत महिन्याकाठी भाडे दिले जात आहे. या कुटुबांची देखील हयात या परिसरात गेली आहे. त्यांच्या मुलांच्या शाळा आणि एकूणच सभोवताल तिथे वसला आहे. दुसरीकडे एवढ्या कुटुंबांना त्या परिसरात एवढ्या भाड्याच्या बजेटमध्ये सामावून घेणारी किती घरे आहेत, हा देखील एक प्रश्न आहे. त्यामुळे त्या भाड्याच्या रकमेत दुसरीकडे लांब जाण्याखेरीज तूर्तास तरी त्यांच्यापुढे पर्याय दिसत नाही.
इथून जर पुढे आपण पश्चिम उपगराकडे आलो (याचे कारण आजच्या घडीला वांद्रे ते विलेपार्ले या परिसरात पुनर्विकासाची अनेक कामे होताना दिसत आहेत.) तर तिथे आणखी वेगळे चित्र पाहायला मिळते. हा परिसर उच्चभ्रू परिसर म्हणून ओळखला जातो. इथल्या लोकांची सध्याची घरेच आलिशान आहेत.
पुनर्विकासानंतर त्यांना आणखी मोठी आणि आलिशान घरे मिळणार आहेत. त्यांना सध्याची घरे रिकामी केल्यानंतर भाड्यापोटी घसघशीत रक्कम मिळणार आहे. त्यांना भाड्याने घर घेताना आपला सध्याचा परिसर सोडायचा नाही. त्यामुळे मागणी जास्त आणि पुरवठा कमी यामुळे या परिसरात सध्या भाड्याच्या किमती ४० टक्क्यांपेक्षा जास्त वाढताना दिसत आहेत. त्यामुळे हे काहीसे मानसिक, अडचणीचे आणि क्लिष्ट अर्थकारणाचे सध्याच्या मुंबईच्या पुनर्विकासाचे सामाजिक वास्तव आहे.