सुमारे २४ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर मुंबईतील प्रसिद्ध सार्वजनिक गणेश मंडळ असलेल्या लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. मात्र अखेरच्या क्षणी लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्यात किरकोळ विघ्न आलं असून, विसर्जनासाठी मूर्ती तराफ्यावर चढवण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे लालबागच्या राजाचं विसर्जन काही काळ खोळंबलं आहे. तसेच लालबागच्या राजाची मूर्ती पुन्हा एकदा तराफ्यावर चढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानंतर लालबागच्या राजाचं विसर्जन केलं जाईल.
सुमारे २२ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाची स्वारी आज सकाळी आठच्या सुमारास गिरगाव चौपाटीवर दाखल झाली होती. येथे लाडक्या लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी भाविकांचा जनसागर लोटला आहे. तसेच पुढच्या वर्षी लवकर या अशी विनंती करत गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत. दरम्यान, लालबागच्या राजाला विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर आणल्यानंतर मूर्ती तराफ्यावर बसवताना अनेक अडचणी आल्या. लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अत्याधुनिक तराफा यावर्षी गुजरातमधून आणण्यात आला होता. मात्र मूर्ती या तराफ्यावर व्यवस्थित बसत नसल्याने विसर्जन खोळंबले आहे. याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार समुद्राला भरती आल्याने मूर्ती तराफ्यावर ठेवता येत नव्हती. भरती ओसरल्यानंतर मूर्ती तराफ्यावर बसवून ती विसर्जनासाठी मार्गस्त करण्यात येणार आहे.
दरम्यान, गेले ११ दिवस उत्साहाने गणरायाची आराधना केल्यानंतर शनिवारी अनंत चतुर्दशी दिवशी मुंबई आणि महाराष्ट्रातील गणेशभक्तांनी लाडक्या गणरायाला जड अंत:करणाने निरोप दिला. मध्य मुंबईतील प्रतिष्ठित गणपती मंडळांसाठी प्रसिद्ध असलेल्या लालबाग येथून यात्रेला सुरुवात झाली होती. त्यामध्ये तेजुकाया, गणेश गली आणि इतर अनेक मंडळांच्या मूर्ती होत्या. विसर्जन प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, बाल गणेश मंडळाचा बल्लाळेश्वर, गणेश गल्लीचा मुंबईचा राजा, काळाचौकीचा महागणपती, रंगारी बुडक चाळ गणपती आणि तेजुकाया गणपती यासारख्या प्रसिद्ध गणपतींच्या मिरवणुका दुपारी १ वाजेपर्यंत मुख्य रस्त्यावर पोहोचल्या होत्या.