मुंबई: मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात सर्वत्र उष्णतेची लाट कायम राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे एप्रिलप्रमाणे मे महिना नागरिकांसाठी 'ताप'दायक ठरणार आहे. ही उष्णतेची लाट नागरिकांना भाजून काढणार आहे. वाढत्या उकाड्यापासून सुटका करण्यासाठी एसी, कूलरसारख्या शीत उपकरणांचा वापर वाढत आहे. त्यामुळे विजेचा वापर वाढत असल्याने विजेच्या मागणीत वाढ होत आहे.
राज्यात दुपारी साडेतीनच्या सुमारास २५ हजार १६७ मेगावॉट विजेची मागणी नोंदविण्यात आली असून, वाढत्या मागणीनुसार विजेचा पुरवठा करण्यात आला नाही. कुठेही भारनियमन करण्यात आले नाही, असा दावा महावितरणने केला. मुंबईत विजेची मागणी एकूण ४ हजार २३ मेगावॉट नोंदविण्यात आली. टाटा पॉवरकडे १ हजार ४४ मेगावॉट, तर बेस्टकडे ८९६ मेगावॉट विजेची मागणी नोंदविण्यात आली.
उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येईल. कोकणात तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहील. मुंबई शहर आणि उपनगरात उष्णतेची लाट राहील. कमाल-किमान तापमान अनुक्रमे ३८, २७ राहील.- मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभाग.
रात्रीच्या उकाड्यामुळे काहिली जाणवणार आहे. विदर्भातील कमाल आणि किमान तापमान सध्या सरासरी इतके असल्यामुळे तेथे सर्वसामान्य उष्णता जाणवेल. मुंबई महानगर प्रदेशाला मे महिन्यात पहिल्या आठवड्यातही असह्य काहिलीचा सामना करावा लागेल.-माणिकराव खुळे, हवामान तज्ज्ञा