Join us  

‘ऐ मेरे वतन के लोगों’ गाण्याचे वीरपत्नींना मिळणारे मानधन थांबले ?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 6:23 AM

कवी प्रदीप यांच्या लेकीचा सवाल : पंतप्रधान मोदींना लिहिणार पत्र

गौरी टेंबकर-कलगुटकर

मुंबई : ‘ऐ मेरे वतन के लोगों’, हे गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायलेले गाणे ऐकून तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या डोळ्यातही अश्रू तरळले होते. देशाच्या सीमेवर प्राणाची बाजी लावून संरक्षण करणाऱ्या सैनिकांची वीरगाथा व्यक्त करत नागरिकांना भावुक करणारे हे गीत स्वातंत्र्यदिनी आणि प्रजासत्ताकदिनी हमखास वाजविले जाते. मात्र, या गीताचे लेखक भारतीय कवी प्रदीप यांनी व्यक्त केलेल्या इच्छेनुसार त्याचे मानधन वीरपत्नींना दिले जात आहे की नाही, याबाबत संबंधित म्युझिक कंपनीकडून गेल्या सात वर्षांपासून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्याबाबत लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार असल्याचे कवी प्रदीप यांच्या लेकीने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

कवी प्रदीप यांच्या कन्या मितुल प्रदीप या विलेपार्ले परिसरात राहतात. त्यांचे वडील कवी प्रदीप यांच्या लेखणीतून ‘ऐ मेरे वतन के लोगों’ गीत लिहिले गेले जे स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायले. ‘ऐ मेरे वतन के लोगों...’, लिहिल्यानंतर लगेचच कवी प्रदीप यांनी इच्छा व्यक्त केली होती की, यातून मिळणारे सर्व मानधन विशेषत: युद्धवीरांच्या विधवांसाठी भारतीय सैन्याकडे जावे. मितुल यांच्या म्हणण्यानुसार, खेदाची बाब म्हणजे, १९९८ म्हणजे त्यांच्या वडिलांचे निधन होईपर्यंत त्याबाबत काहीही झाले नाही. त्यानंतर, त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आणि न्यायालयाने संबंधित संगीत कंपन्यांना २५ ऑगस्ट, २००५ साली भारतीय लष्कराला मानधन देण्याचे आदेश दिले. त्यानुसार २०१५ पर्यंत १० लाख रुपये सदर कंपनीने दिले. मात्र, त्यानंतर म्हणजे जवळपास सात वर्षे किती मानधन सैन्याला देण्यात आले, याबाबत कोणतीही माहिती मला देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्याचे पुढे काय झाले, हे जाणून घेण्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना पत्र लिहणार आहे. 

भूल न जाओ उन को...माझ्या वडिलांनी १९६२ साली भारत - चीन युद्धात शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली म्हणून हे गीत लिहिले. जे लतादीदींनी दिल्लीच्या रामलीला मैदानात गायल्यावर तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचेही डोळे पाणावले. त्यामुळे या गाण्याची रॉयल्टी वीरपत्नींना दिली जावी अशी वडिलांची इच्छा होती. याबाबत २०१५ पासून काहीच माहिती मला देण्यात आली नसून संरक्षण दलाने याची दखल घेण्यासाठी पंतप्रधानांना पत्राद्वारे लक्ष घालण्याची विनंती करणार आहे. जेणेकरून त्यांच्या इच्छेचा विसर पडू नये.     - मितुल प्रदीप (कवी प्रदीप यांच्या कन्या)

टॅग्स :मुंबईसैनिकप्रजासत्ताक दिनशहीद