Join us
Daily Top 2Weekly Top 5

संगीत कारंज्यांतून गिरणगावचा इतिहास, नव्या पिढीला गतवैभव पाहण्याची संधी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 09:35 IST

संगीत कारंजातून गिरणगावचा इतिहास.

मुंबई :मुंबईची ओळख असणाऱ्या कापड गिरण्या बंद पडल्या आणि त्यात काम करणारे कामगार यांची ओळख काळाच्या ओघात पुसून गेली. मात्र, लवकरच गिरण्यांच्या इतिहासाला पुन्हा उजाळा मिळणार आहे. इंडिया युनायटेड मिलच्या जागेवर उभ्या राहात असलेल्या टेक्स्टटाईल म्युझियममध्ये संगीत कारंज्यावरील जलपटाचे काम अंतिम टप्प्यात आले असून,  या जलपटाच्या माध्यमातून गिरण्यांच्या इतिहासाची पाने उलगडली जातील. त्यामुळे नव्या पिढीला गिरण्यांचे गतवैभव पाहण्याची संधी मिळेल.

लोकार्पण कधी?

तळ्यात नॅनो बबल प्रणाली बसवल्यानंतर संगीत कारंज्याचे काम पूर्ण होईल. त्यानंतर पहिल्या टप्प्यातील कामाचे लोकार्पण होईल. त्यानंतर मुंबईकरांना या ठिकाणी गिरण्यांचा इतिहास पाहता येईल.  

आता टेक्स्टटाइल म्युझियमही:

    उर्वरित ३७ हजार चौरस मीटर जागेत टेक्स्टटाइल म्युझियम उभारले जाणार आहे.

    या ठिकाणी मुंबईतील गिरण्या, त्याकाळी या गिरण्यांमधून तयार होणारे कापड, तेथील कार्यपद्धती याची सविस्तर माहिती मिळेल. टेक्स्टटाईल म्युझियम  उभारण्याचा प्रस्ताव हा खूप जुना आहे. मात्र आता तो आकारास येत आहे.

 

तळ्याचेही सुशोभीकरण :

गिरणीतील तलावाच्या आसपास वाढलेली झाडी-झुडुपे काढली जाणार आहेत. संगीत कारंजे प्रणाली याच तळ्यात उभारली जाणार आहे. त्यासाठी तळ्यातील पाण्याचा दर्जा उच्च ठेवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. तळ्यामध्ये नॅनो बबल स्वरूपाचे हे  तंत्रज्ञान असेल. त्यासाठी ५० लाख रुपये खर्च अपेक्षित असून पुढील चार महिन्यात हे काम पूर्ण होईल.

 

गिरणगावातील जीवनमान :

कापड गिरण्या बंद झाल्यानंतर त्या जागेवर व्यावसायिक तसेच निवासी संकुले उभी राहिली. काही जागा म्हाडा आणि मुंबई महापालिकेच्या ताब्यात आल्या. पालिकेने आपल्या ताब्यातील जागेवर काही उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. काळाचौकी येथील इंडिया युनायटेड मिलमध्ये टेक्स्टटाईल म्युझियम व सांस्कृतिक केंद्र उभारले जात आहे. 

पालिकेच्या ताब्यातील ४४ हजार चौरस  मीटर जागेवर पहिल्या टप्प्यात गिरणगावातील जीवनमान आणि गिरण्यांची माहिती  जलपटाच्या अर्थात संगीत कारंज्याच्या माध्यमातून दिली जाईल. संगीत कारंजे, ध्वनी आणि प्रकाश व्यवस्थेमार्फत चित्रीकरणाच्या माध्यमातून पट उलगडला जाईल.

टॅग्स :मुंबईनगर पालिका