Join us

ऐतिहासिक माहीम किल्ला पुन्हा उजळणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 14:17 IST

सीमा शुल्क विभागाकडून सीमांकन प्रक्रिया पूर्ण झाल्याने मुंबई महापालिकेला पुनरुज्जीवन आराखडा तयार करण्यासाठी हिरवा कंदील मिळाला आहे. त्यामुळे लवकरच शिवप्रेमी आणि पर्यटकांना माहीम किल्ल्याचे पुरातन वैभव अनुभवता येणार आहे, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

मुंबई :  माहीम किल्ला पुन्हा उजळणार असून, त्याचे ऐतिहासिक वैभव किल्ल्याला पुन्हा प्राप्त होणार आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर किल्ल्याच्या पुनरुज्जीवन आराखड्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सीमा शुल्क विभागाकडून सीमांकन प्रक्रिया पूर्ण झाल्याने मुंबई महापालिकेला पुनरुज्जीवन आराखडा तयार करण्यासाठी हिरवा कंदील मिळाला आहे. त्यामुळे लवकरच शिवप्रेमी आणि पर्यटकांना माहीम किल्ल्याचे पुरातन वैभव अनुभवता येणार आहे, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

सागरी आरमाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा हा किल्ला एकेकाळी मुंबईच्या समुद्री संरक्षणाचा शिलेदार मानला जायचा. सुमारे एक हजार वर्षांचा इतिहास असलेला हा किल्ला अनेक युद्धांचा आणि ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार राहिला आहे. त्याला ग्रेड-१ वारसास्थळ म्हणून मानांकन देण्यात आले आहे. मात्र, गेल्या काही दशकांतील अतिक्रमणे, दुर्लक्ष आणि समुद्री लाटांमुळे किल्ल्याची वास्तू जीर्णावस्थेत पोहोचली होती.  या किल्ल्यावर २६७ झोपड्या आणि सुमारे तीन हजार रहिवासी होते.  पालिकेने मागील वर्षी किल्ल्यावरील अतिक्रमणे हटवून परिसर मोकळा केला होता. किल्ल्यावर अतिक्रमण केलेल्यांपैकी २६३ पात्र झोपडीधारकांचे मालाड व कुर्ला येथे पुनर्वसन करण्यात आले. त्यानंतर किल्ल्याचे जतन, संरक्षण आणि सौंदर्यीकरणावर पालिकेने लक्ष       केंद्रित केले. 

पालिका, सीमाशुल्क विभागामध्ये करारपालिका आणि सीमा शुल्क विभाग यांच्यामध्ये औपचारिक करार होणार असून, त्यानंतर कामाच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात होईल.  या पुनरुज्जीवन आराखड्याची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार आहे.

पुनरुज्जीवन आराखड्याचा मार्ग झाला मोकळा किल्ल्याच्या पुनरुज्जीवन आराखड्याचा मार्ग मोकळा झाला असून कामासाठी व्हीजेटीआय अर्थात वीरमाता जिजाबाई तांत्रिक संस्थेतील तज्ज्ञांकडून किल्ल्याचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार असून, तांत्रिक अहवालानुसार पुनर्बांधणीची कामे केली जाणार आहेत. समुद्री वारे आणि पाण्याच्या झटक्यामुळे निखळलेल्या भागांची दुरुस्तीही केली जाईल. 

या उपक्रमामुळे मुंबईच्या इतिहासातील एक महत्त्वाचे पान पुन्हा उजळण्याची आणि माहीम किल्ला शहरातील एक आकर्षक पर्यटनस्थळ म्हणून उभा राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Mahim Fort to regain historical glory after restoration approval.

Web Summary : Mahim Fort's restoration gets green light after years of waiting. The fort, a Grade-1 heritage site, will be revived, removing encroachments. Structural audits will guide reconstruction, making it a tourist spot.
टॅग्स :गड