Join us  

"झुकती है, सरकार झुकानेवाला चाहिए", पेट्रोल दरकपातीनंतर शिवसेनेचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2022 11:15 AM

केंद्र सरकारने यापूर्वी इंधनावरील टॅक्स कमी करण्याचं आवाहन राज्य सरकारला केलं होत.

मुंबई - देशातील इंधन दरवाढ आणि वाढलेल्या महागाईवरुन केंद्र सरकारवर मोठ्या प्रमाणात टिका होत आहे. आता, केंद्र सरकारनेच उत्पादन शुल्क कमी केल्याने इंधन दरात मोठी कपात झाली आहे. त्यावरुन, मोदी सरकारचे अभिनंदन करत देवेंद्र फडणवीसांनी ट्विट केलं. या ट्विटमध्ये त्यांनी महाराष्ट्र सरकारनेही उत्पादन शुल्क कमी करुन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी विनंती केली आहे. त्यावर, मुख्यमंत्र्यांनीही पलटवार केला आहे. आता, शिवसेना नेत्या आणि खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही केंद्र सरकावर टिका केली. 

केंद्र सरकारने यापूर्वी इंधनावरील टॅक्स कमी करण्याचं आवाहन राज्य सरकारला केलं होत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही अप्रत्यक्षपणे त्यांनी कोविडच्या बैठकीत हे सूचवलं होतं. मात्र, राज्याने कर न हटविल्यामुळे महाराष्ट्रात दरकपात झाली नाही. अखेर, केंद्र सरकारनेच शनिवारी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली. पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर ८ रुपये आणि डिझेलवर ६ रुपये प्रति लिटरने कमी करत असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली. यामुळे पेट्रोलचे दर प्रतिलिटर ९ रुपये ५० पैशाने तर डिझेलचे दर ७ रुपयांनी कमी होणार आहेत.

तसेच, केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या ९ कोटींहून अधिक लाभार्थ्यांना प्रति गॅस सिलेंडर (१२ सिलेंडरपर्यंत) २०० रुपये सबसिडी देण्याची घोषणा केली. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला काही अंशी दिलासा मिळाला. अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केले. पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र याबाबत काहीसे वेगळे मत व्यक्त केले. तर, प्रियंका चतुर्वेदी यांनीही ट्विट करुन केंद्र सरकावर निशाणा साधला.

प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विट करुन ''झुकती है सरकार, झुकानेवाला चाहिए'' असे म्हणत प्रियंका यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. प्रियंका यांनी निर्मला सितारमण यांच्या ट्विटचे फोटो शेअर केले आहेत. तसेच, आपल्या कॅप्शनमधून त्यांनी जनतेच्या रोषापुढे सरकारला झुकावं लागलं, असे म्हटलं आहे. अखेर, देशावासियांची पीडा समजून तर आली, असेही प्रियंका यांनी म्हटलं आहे.    मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले...

केंद्र सरकारने दोन महिन्यांपूर्वी पेट्रोलवरचा अबकारी कर प्रति लिटर १८.४२ रुपये इतका वाढविला होता आणि आज तो ८ रुपयांनी कमी केल्याची घोषणा केली. डिझेलवरील अबकारी कर देखील १८ रुपये २४ पैशांनी वाढविले आणि आता ६ रुपयांनी कमी केल्याची घोषणा केली आहे. आधी किंमती भरमसाठ वाढवायच्या आणि नंतर नाममात्र कमी करून दर कमी केल्याचा आव आणायचा हे बरोबर नाही. आकडेवारीच्या जंजाळात नागरिकांना अडकवून न ठेवता सहा सात वर्षांपूर्वी असलेला अबकारी कराइतकी कपात केल्यासच खऱ्या अर्थाने देशातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच, पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी कर आणखी कमी करावयास हवे अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :पेट्रोलशिवसेनानिर्मला सीतारामनउद्धव ठाकरे