Join us

फ्रीवे ते मरिन ड्राइव्ह प्रवास आता होणार सुसाट, भूमिगत बोगद्याचे काम लार्सन अँड टुब्रो कंपनी करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 13:56 IST

Mumbai: दक्षिण मुंबईतील वाहतूककोंडी फोडण्यासाठी पूर्व मुक्त मार्गावरील ऑरेंज गेट ते मरिन ड्राइव्हदरम्यान एमएमआरडीएमार्फत मार्ग बांधण्यात येत आहे. ९  किमी लांबीच्या या मार्गात दोन भूमिगत बोगदे असून या कामाचे कंत्राट लार्सन अँड टुब्रो कंपनीला देण्यात आले आहे.

मुंबई -  दक्षिण मुंबईतील वाहतूककोंडी फोडण्यासाठी पूर्व मुक्त मार्गावरील ऑरेंज गेट ते मरिन ड्राइव्हदरम्यान एमएमआरडीएमार्फत मार्ग बांधण्यात येत आहे. ९  किमी लांबीच्या या मार्गात दोन भूमिगत बोगदे असून या कामाचे कंत्राट लार्सन अँड टुब्रो कंपनीला देण्यात आले आहे. येत्या काही वर्षांत हे काम पूर्ण होणार असून या मार्गामुळे मुंबईकरांचा प्रवास आणखी जलद होणार आहे.

एमएमआरडीएमार्फत मुंबई शहराच्या पूर्व किनारपट्टीस समांतर असा मानखुर्द-चेंबूर जोडरस्त्यापासून पी’ डिमेलो रस्त्यावरील ऑरेंज गेटपर्यंत पूर्व मुक्तमार्ग बांधण्यात आला आहे. पूर्व मुक्त मार्गावरील वाहतूक मुंबई पोर्ट ट्रस्टच्या ऑरेंज गेट येथे गजबजलेल्या पी’डिमेलो मार्गावर येऊन मिळतो. त्यामुळे गर्दीच्यावेळी याठिकाणी वाहनांच्या मोठ्या रांगा लागतात. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील पी’डिमेलो मार्गावरील मुख्य पोस्ट ऑफिसच्या चौकात वाहतूक कोंडी होते. पालिकेतर्फे पश्चिम किनारपट्टीवर कोस्टल रोड बांधण्यात येत आहे. पूर्वेकडून पश्चिम बाजूस जाण्यासाठी व वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ऑरेंज रस्त्याचे काम सुरू आहे. 

असा आहे प्रकल्पएकूण ९.२३ किमी लांबीच्या प्रकल्पाच्या बांधकामामध्ये टनेल बोअरिंग मशीनच्या मदतीने  ६.५१ किमी लांबीच्या भूमिगत बोगद्यांचे बांधकाम करणे, तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने बोगद्यांच्या आतील बाजूस काँक्रिटीकरण करणे, क्रॉस पॅसेजची रचना इत्यादीचे बांधकाम केले जाणार आहे. बोगद्याच्या आतील बाजूचा व्यास ११ मीटर आहे. प्रत्येक बोगद्यामध्ये वाहतुकीसाठी २ २ मार्गिका व १ १  आपत्कालीन मार्गिका आणि पादचारी मार्ग अशी रचना प्रस्तावित आहे. 

या मार्गात ६.५१ किमी लांबीचा दुहेरी भूमिगत बोगदा बांधण्यात येणार आहे. एमएमआरडीएच्या कार्यकारी समितीची बैठक मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी एमएमआरडीए महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी व इतर अधिकारी उपस्थित होते. 

हे सर्व प्रकल्प वाहतूककोंडी सोडविण्याच्या दृष्टीने एकमेकांस पूरक ठरतील, अशा पद्धतीने उभारण्यात येत आहेत. ज्यामुळे नागरिकांना प्रदेशातील अंतर्गत वाहतुकीसाठी विविध पर्याय उपलब्ध होणार असून शहरातील एका भागातून दुसऱ्या भागात पोहोचणे सोपे होणार आहे.- डॉ. संजय मुखर्जी, महानगर आयुक्त, एमएमआरडीए.

टॅग्स :मुंबई