मुंबई - उपनगरीय रेल्वे सेवेसाठी २३८ नवीन एसी लोकल खरेदी करण्यात येणार आहेत. त्याची बोलीपूर्व बैठक नुकतीच झाली. त्यामुळे तांत्रिक व व्यावसायिक मुद्द्यांवर आवश्यक स्पष्टता आली असून, नमुना लोकल (प्रोटोटाइप ट्रेनसेट) सुमारे अडीच वर्षांत तयार होईल, अशी माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या (एमआरव्हीसी) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर अधिक संख्येने वातानुकूलित लोकल धावणार आहेत. यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) तयारी पूर्ण केली आहे. त्यानुसार तब्बल २३८ एसी लोकल खरेदीसाठी गेल्या वर्षी निविदा जारी केली होती. एमयूटीपी-३ अंतर्गत ४७, तर एमयूटीपी-३ ए अंतर्गत १९१ एसी लोकल खरेदी होणार आहेत. यासाठी सुमारे १९ हजार २९३ कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव आहे.
निविदेत अत्याधुनिक वातानुकूलित ईएमयू ट्रेनसेटचे २,८५६ एसी लोकलचे डब्बे खरेदी करण्यात येणार आहेत. नियोजनानुसार पहिला नमुना लोकल (प्रोटोटाइप ट्रेनसेट ) सुमारे अडीच वर्षांत तयार होईल. ‘प्रोटोटाइप’ मान्यतेनंतर ४ ते ६ वर्षांत पुरवठा सुरू होणार आहे, अशी माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या (एमआरव्हीसी) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. तर लोकलची देखभाल ३५ वर्षे कंत्राटदाराकडे ठेवण्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले आहे, असेही एमआरव्हीसी अधिकाऱ्यांनी सांगितले.
गाड्यांची रचना कशी? नवीन लोकल ट्रेनची रचना करताना मुंबईतील गर्दी लक्षात घेण्यात येणार आहे. वॉक-थ्रू कोच, अधिक मोकळी अंतर्गत रचना व डिजिटल सुविधा असणार आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले, नामांकित कंत्राटदारांचा सक्रिय सहभाग बोली पूर्व बैठकीत होता. बहुतेक प्रश्नांचे निराकरण करण्यात आले. त्यामुळे बोली प्रक्रियेत विलंब होण्याची शक्यता नसल्याचे संकेत आहेत.
गर्दीनुसार तापमान संतुलननवीन लोकलमध्ये गर्दीनुसार तापमान संतुलित करण्याची क्षमता असलेली अत्याधुनिक ‘एचव्हीएसी’ प्रणाली बसविली जाणार आहे. सध्याच्या स्टीलच्या आसनांऐवजी गादीयुक्त आरामदायी असतील, अशी शक्यता आहे. वाढीव विद्युत शक्तीमुळे या लोकल ११० किमीऐवजी १३० किमी प्रतितास वेगाने धावू शकतील. या लोकलच्या देखभालीसाठी मध्य रेल्वेच्या भिवपुरी येथे आणि पश्चिम रेल्वेच्या वाणगावमध्ये डेपो असणार आहेत.
Web Summary : Mumbai will get 238 new AC local trains. The first prototype is expected in two and a half years. These trains will have advanced features and higher speed capabilities. Maintenance will be contracted for 35 years.
Web Summary : मुंबई को 238 नई एसी लोकल ट्रेनें मिलेंगी। पहला प्रोटोटाइप ढाई साल में आने की उम्मीद है। इन ट्रेनों में उन्नत सुविधाएँ और उच्च गति क्षमता होगी। रखरखाव 35 वर्षों के लिए अनुबंधित किया जाएगा।