Join us

खरेदीचा उत्साह, गर्दीचा उच्चांक; दिवाळीनिमित्त दादर, परळमधील बाजारपेठा फुलल्या....

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2023 10:10 IST

आज, रविवारी लक्ष्मीपूजनाचा दिवस असल्याने साहित्य खरेदीसाठी मुंबईकर सहकुटुंब खरेदीसाठी बाहेर पडल्याचे चित्र वारी होते.

मुंबई : धनत्रयोदशीनंतर वसुबारस आणि आता शनिवारपासून खासगी कार्यालये, कंपन्या तसेच कॉर्पोरेट क्षेत्रातील आस्थापना यांना सुट्ट्या लागल्याने खऱ्या अर्थाने दिवाळीच्या खरेदी उत्साहाला उधाण आले आहे. त्याचेच प्रतिबिंब शनिवारी दादर, परळसह अन्य मुख्य बाजारपेठांमध्ये दिसून आले. कपडे, फराळ, फटाके, फुले, सजावटीचे सामान इत्यादींच्या खरेदीला प्राधान्य दिले जात होते. 

आज, रविवारी लक्ष्मीपूजनाचा दिवस असल्याने साहित्य खरेदीसाठी मुंबईकर सहकुटुंब खरेदीसाठी बाहेर पडल्याचे चित्र वारी होते. फेरीवाल्यांना मुभा दिल्याने दादरच्या प्रत्येक गल्लीत, पदपथावर फेरीवाल्यांकडील वस्तूंच्या खरेदीसाठी झुंबड उडाली होती. त्यामुळे शहरातील सर्वच प्रमुख बाजार परिसरांत वाहनकोंडी निर्माण झाली होती. मनसोक्त खरेदी करण्यासाठी उपनगरवासीयांनी शनिवार सुट्टीला पसंती दिली. त्यामुळे उपनगरातील बांद्रा लिंकिंग रोड, गोरेगाव पश्चिम बाजार आणि मालाड पश्चिम बाजारात तुफान गर्दी होती.

रात्री उशिरापर्यंत खरेदी

रविवारी असलेले लक्ष्मीपूजन त्यापाठोपाठ पाडवा आणि भाऊबीज असल्याने साहित्यखरेदीसाठी मुंबईच्या सर्वच बाजारांत सकाळपासून गर्दी होती. उकाडा असूनही गर्दीवर त्याचा परिणाम झालेला दिसत नव्हता.' खरेदीसाठी अनेक जण सहकुटुंब बाजारात येत असल्याने दुकानांमध्ये रात्री उशिरापर्यंत खरेदीसाठी रीघ होती. अशा तुफान गर्दीत पाय ठेवायलासुद्धा जागा नव्हती. त्यातून वाट काढताना अनेकांची दमछाक झाली. दादर रेल्वे स्थानकालगतचा फूलबाजार, आयडीयल बुक डेपो गल्ली, प्लाझा सर्कल, कबुतरखाना, रानडे रोड आणि पुढे शिवाजी मंदिरासह सेनाभवनापर्यंत खरेदीदारांनी तुफान गर्दी केली होती. दादरच्या प्रत्येक गल्ली, पथपदावर फेरीवाल्यांकडून साहित्यखरेदीसाठी झुंबड दिसत होती.

सोने-चांदीची दुकानेही फुल्ल

काळबादेवी, मुंबादेवी, क्रॉफर्ड मार्केटमध्येसुद्धा शनिवारी गर्दी होती. लक्ष्मीपूजन आणि भाऊबीजेसाठी सोने- चांदीच्या वस्तू विकत घेण्यासाठी चांदी-सोना बाजार, पितळ बाजार परिसरात खरेदीदारांची गर्दी होती. परळ शिंदेवाडी परिसरात घाऊक साड्या खरेदीसाठी दुकाने गच्च भरली होती.

टॅग्स :बाजारदिवाळी 2023