Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील काही भागांत तापमान अधिक का? पालिका,'निरी' करणार अभ्यास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 09:34 IST

वातावरणातील बदल हा अलीकडच्या काळातील चिंतेचा विषय आहे.

मुंबई : वातावरणातील बदल हा अलीकडच्या काळातील चिंतेचा विषय आहे. प्रदूषण आणि तापमान यांची वाढ हा प्रश्नही भेडसावत आहे. ठाणे-मुलुंड टोलानाका, भक्तीपार्क, शिवडी-चेंबूर रोड, माहुल-ट्रॉम्बे औद्योगिक परिसर व कांदिवलीतील गणेशनगर येथील तापमान अन्य भागांच्या तुलनेत जास्त असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे नेमक्या कोणत्या भागांत तापमान जास्त आहे, याचा अभ्यास मुंबई पालिकेचा पर्यावरण विभाग व राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन (निरी) संस्था करत आहे.

मुंबईत मागील काही दिवसांत तर ३९ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. मुंबईतील तापमान आणि प्रदूषण वाढीचा अभ्यास करणे अनिवार्य झाले आहे. त्यामुळे कोणत्या भागांत तापमानात वाढ होते याचा शोध घेतला जात आहे. धूळ प्रदूषण नियंत्रणासाठी जाहीर केलेल्या नियमावलीचाही आधार या कामी घेतला जाणार आहे.

वृक्षलागवड, प्रदूषणावर नियंत्रण हेच उपाय -

तापमान वाढीचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. उद्योग, बांधकामे सुरू असलेल्या भागांत तापमान वाढ होत असल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे. वाढते तापमान कमी करण्यासाठी उपाय योजले जाणार आहेत. कारखाने, उद्योग यांमुळे तापमान वाढ होणार नाही, यासाठीही उपाय योजले जाणार आहेत. तापमान वाढ कमी करण्यासाठी झाडांची लागवड करणे, वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवणे, स्प्रिंकलरचा वापर करणे आदी उपाय सुचविण्यात आले आहेत.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकातापमान