मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी गुरुवारी प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली. मात्र, त्यामध्ये दुबार नावांचा भरणा आहे. अनेक ठिकाणी याद्यांत फक्त पत्ते असून, नावे मात्र गायब आहेत. टी वॉर्डातील प्रभाग क्रमांक १०६ मध्ये अशी चूक १३ ठिकाणी आहे. मतदार यादीत वगळलेली नावे आणि दुबार नावे दाखवण्यासाठी वापरलेल्या चिन्हाऐवजी दुसऱ्या चिन्हाचा वापर केल्यानेही गोंधळ आहे.
हरकती व सूचना नोंदविण्यासाठी २७ नोव्हेंबर ही अंतिम मुदत आहे. मात्र, दोनच दिवसांत या यादीवर तक्रारींचा पाऊस पडला. टी वॉर्ड म्हणजेच मुलुंड परिसरातील प्रभाग क्रमांक १०६ मध्ये सुमारे ४४ हजार ४८७ मतदार आहेत. त्यातील अनेक मतदारांचे फक्त पत्तेच यादीत असून, नावे गायब आहेत. त्यामुळे मतदाराचे नावच नसेल तर ते मतदानापासून वंचित राहण्याची भीती सामाजिक कार्यकर्ते ॲड. सागर देवरे यांनी व्यक्त केली. काही ठिकाणी तर पत्ता ही अस्तित्वात आहे का, याची चाचपणी होण्याची मागणी आहे.
जबाबदारी कोण घेणार? महापालिकेच्या माहितीनुसार, मुंबईच्या १ कोटी ३ लाख मतदारांमध्ये तब्बल ११ लाख मतदारांची नावे दुबार आहेत. त्यातील सर्वाधिक दुबार मतदार पश्चिम उपनगरात असून, ते ४ लाख ९८ हजार आहेत. पूर्व उपनगरात ३ लाख २९ हजार, तर शहरात २ लाख ७३ हजार दुबार मतदार आहेत. महापालिका मतदार याद्यांचे प्रभागनिहाय विभाजन महापालिका स्तरावर करण्यात आल्याचे आधीच राज्य निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे दुबार मतदार वगळण्याचे आणि मतदार याद्यांतील घोळ दूर करण्याचे आव्हान महापालिकेपुढे आहे.
चिन्हांमुळेही वाढला ताप महापालिकेकडून जाहीर प्रारूप मतदार यादीत मतदारांनी वगळलेले नाव स्टार चिन्हाने, तर दुबार नावे (दोन माणसांची प्रतिमा) या चिन्हाने शोधावे, अशा सूचना केलेल्या आहेत. प्रत्यक्षात मात्र दुबार नावांसाठी दोन स्टार या चिन्हाचा वापर केला असल्याने सुरुवातीला दुबार नवे शोधताना राजकीय कार्यकर्त्यांचा गोंधळ उडाल्याची माहिती काही कार्यकर्त्यांनी दिली. पालिकेकडून निवडणुकीचे आणि मतदार याद्यांचे काम अनेक महिने झाले सुरू असताना अशा चुका का झाल्या, असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे.
Web Summary : Mumbai's draft voter list for upcoming elections is riddled with errors. Duplicate entries, missing names, and incorrect symbols are causing confusion. Citizens lodge complaints regarding these discrepancies, especially in ward 106, demanding immediate correction before the deadline.
Web Summary : मुंबई की आगामी चुनावों के लिए मतदाता सूची त्रुटिपूर्ण है। दोहरी प्रविष्टियाँ, गुम नाम और गलत प्रतीकों से भ्रम हो रहा है। नागरिक इन विसंगतियों के बारे में शिकायतें दर्ज करा रहे हैं, खासकर वार्ड 106 में, समय सीमा से पहले तत्काल सुधार की मांग कर रहे हैं।