मुंबई : ‘ऑपरेशन सिंदूर’बाबतची पोस्ट सोशल मीडियावरून हटविली किंवा त्याबाबत माफी मागितली म्हणून तिच्याविरोधातील गुन्हा रद्द करता येणार नाही, असे उच्च न्यायालयाने शुक्रवारी स्पष्ट केले. १९ वर्षीय विद्यार्थिनीने ही पोस्ट केली होती.
आरोपी हुशार विद्यार्थिनी आहे आणि तिने परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळविले आहेत, या आधारावर तिच्यावरील गुन्हा रद्द होऊ शकत नाही, असे मुख्य न्या. चंद्रशेखर व न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठाने म्हटले.
‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान भारत-पाकिस्तान युद्धाबाबत आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केल्याने कॉलेजमधील पुण्यातील एका विद्यार्थिनीवर गुन्हा दाखल करण्यात आला. तो रद्द करण्यासाठी विद्यार्थिनीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
ही पोस्ट करण्यामागे मुलीचा चुकीचा हेतू नव्हता. तिने तातडीने पोस्ट हटविली. माफीही मागितली. तिने पोस्ट हटविल्याने प्रकरण आणखी गुंतागुंतीचे आणि बिकट झाले आहे, असे न्यायालयाने म्हटले. न्यायालयाने सरकारी वकील मनकुँवर देशमुख यांना केस डायरी सादर करण्याचे निर्देश देत या प्रकरणावरील सुनावणी दोन आठवड्यांत ठेवली.
न्यायालय काय म्हणाले?
गुन्हा दाखल झाल्यानंतर तिला अटक करण्यात आली. त्यानंतर उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर तिची सुटका करण्यात आली. मुलीची जामिनावर सुटका केल्यानंतर तिने परीक्षा दिली. तिला चांगलेच गुण मिळाले. मात्र, वकिलांचे हे म्हणणे फेटाळताना न्यायालयाने म्हटले की, आरोपी हुशार विद्यार्थिनी आहे, या आधारे तिच्यावरील गुन्हा रद्द केला जाऊ शकत नाही.