ट्रान्स हार्बर लिंकचा खर्च दोन हजार कोटींनी वाढला
By सचिन लुंगसे | Updated: December 29, 2023 19:34 IST2023-12-29T19:34:05+5:302023-12-29T19:34:20+5:30
मुंबई : बहुचर्चित आणि उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाच्या खर्चात २ हजार १९२ कोटी रुपयांची वाढ ...

ट्रान्स हार्बर लिंकचा खर्च दोन हजार कोटींनी वाढला
मुंबई : बहुचर्चित आणि उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाच्या खर्चात २ हजार १९२ कोटी रुपयांची वाढ झाल्याचे माहिती अधिकाराखाली प्राप्त कागदपत्रांतून समोर आले आहे. शिवाय आतापर्यंत २ डेडलाइन चुकविणाऱ्या कंत्राटदारांना कोणताही दंड आकारण्यात आला नसून, प्रकल्पाचे कामही १०० टक्के पूर्ण झालेले नाही. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक या प्रकल्पाची माहिती मागितली होती. यावर प्राधिकरणाने दिलेल्या कागदपत्रांतून ही माहिती समोर आली आहे.
----------
मूळ खर्च १४ हजार ७१२.७० कोटी होता. यात २ हजार १९२.७३ कोटींची वाढ झाली. आता १६ हजार ९०४.४३ कोटी इतका खर्च झाला आहे.
----------
कंत्राटदारांनी कशा चुकविल्या डेडलाइन
१) २२ सप्टेंबर २०२२ रोजी काम पूर्ण करणे अपेक्षित होते.
२) एमएमआरडीएने २२ सप्टेंबर २०२३ ही प्रथम मुदत वाढ दिली.
३) १५ डिसेंबर २०२३ ही दुसरी मुदतवाढ होती. पण अद्यापही काम पूर्ण झाले नाही.
----------
जपान आंतरराष्ट्रीय सहकार संस्थेकडून घेण्यात आलेल्या कर्जातून प्रकल्प राबविण्यात येत आहे.
----------
पॅकेज १, २ आणि ३ ची सर्वसाधारण भौतिक प्रगती-९८.९२ टक्के
पॅकेज ४ - भौतिक प्रगती ८२ टक्के
सरासरी भौतिक प्रगती ९८.४१ टक्के
----------
पॅकेज १
लार्सन अँड टुब्रो लिमिटेड आयएचआय इन्फ्रास्ट्रक्चर सिस्टीम कंसोशिअमची कंत्राटी किंमत ७ हजार ६३७.३० कोटी होती. यात ९९९.६७ कोटींची वाढ झाली.
----------
पॅकेज - २
देवू इंजिनिअरिंग अँड कन्स्ट्रक्शन व टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड जेव्ही यांची कंत्राटी किंमत ५ हजार ६१२.६१ कोटी होती. यात ९३६.४५ कोटींची वाढ झाली.
----------
पॅकेज ३
लार्सन अँड टुब्रोची कंत्राटीय कंत्राटी १ हजार १३.७९ कोटी होती. यात २३२.३७ कोटींची वाढ झाली.
----------
पॅकेज ४
स्ट्रॉबॅग इन्फ्रास्ट्रक्चर ॲण्ड सेफ्टी सोल्यूशन्स जीएमबीएच जेव्ही यांची कंत्राटीय किंमत ४४९ कोटी होती. यात २३.२४ कोटींची वाढ झाली.