Join us  

कॉकपिट कापून वैमानिकांना बाहेर काढले, विमान दुर्घटनेत आठही जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 1:34 PM

Mumbai Plane Crash:

मुंबईमुंबईविमानतळावर ज्यावेळी छोटेखानी विमान कोसळले त्यावेळी त्याचे दोन तुकडे झाले. कॉकपिट, म्हणजे जेथून विमान चालवले जाते त्या भागाचा वेगळा तुकडा पडला होता. दोन्ही वैमानिक त्यामध्ये अडकले होते. त्यांना सहजपणे काढणे शक्य झाले नाही. कॉकपिट कापून वैमानिकांना बाहेर काढण्यात आले. 

विमान अपघातात आठही जण जखमी झाले असून त्यांना अंधेरीच्या क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. सह-कप्तान नील दिवाण हे अधिक जखमी असल्याने त्यांना शुक्रवारी अन्यत्र हलविण्यात आले. त्यांच्यावर तातडीची शस्त्रक्रिया झाली. उपलब्ध माहितीनुसार, नील दिवाण यांना शरीरात अनेक ठिकाणी गंभीर जखमा झाल्या असून हाडांना देखील इजा पोहोचल्याचे समजते. तर, विमानाचे मुख्य वैमानिक सुनील भट यांच्या डोक्याला, ओठाच्या डाव्या बाजूला लागले असून उजव्या पायाला फ्रॅक्चर झाल्याची माहिती आहे. 

जे.एम. बक्सी कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ध्रूव कोटक यांच्या उजव्या हाताच्या दंडाला व कपाळाला मार बसला आहे. तर, अन्य प्रवासी अरुण सली यांच्या डोक्यावर टाळूला मार बसला आहे. या विमानात केबिन कर्मचारी असलेल्या कामाक्षी या महिलेच्या कपाळाला मार बसला असून उजव्या पावलाला देखील फ्रॅक्चर झाले आहे. लार्स सोरेनन या डेन्मार्कच्या नागरिकाच्या तीन बरगड्या फ्रॅक्चर झाल्या आहेत. के.के. कृष्णदास यांच्या उजव्या पावलाला फ्रॅक्चर झाले आहे, तर कपाळाला देखील जखम झाली आहे.  आकाश सेठी यांना फारशी दुखापत झालेली नाही.

विमान अन्वेषण  विभाग करणार अपघाताची चौकशीविमान अपघाताची सखोल चौकशी करण्याचे निर्देश नागरी विमान महासंचालनालयाने दिले आहेत. विमान अन्वेषण विभागातर्फे एक टीम तयार करण्यात आली असून ती यासंदर्भात चौकशी करून अहवाल सादर करेल. सकृतदर्शनी, ज्यावेळी विमान धावपट्टीवर उतरू पाहात होते, त्यावेळी तिथे दृष्यमानता कमी होती व पाऊस देखील जोरात होता. त्यामुळे विमान कोसळल्याचे मानले जात आहे. मात्र, नेमकी तांत्रिक चूक काय झाली किंवा अपघात कसा झाला याची चौकशी या समितीद्वारे केली जाईल.

टॅग्स :मुंबईविमान