Join us  

टोल नाक्यापुढे बिबट्याचा मृतदेह आढळला, वनविभागाने घेतली धाव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 11:07 PM

वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल होऊन बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी बोरिवलीच्या संजय गांधी उद्यानात नेण्यात आला.

मीरारोड - घोडबंदर टोल नाक्यापुढे रस्त्याजवळ बिबट्याचा मृतदेह आढळून आल्याने हळहळ व्यक्त होत आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतचा परिसर असलेल्या घोडबंदर टोल नाक्यावरून पुढे चेणेचे दिशेने जाताना रस्त्याजवळ उजव्या बाजूच्या खदानीत बिबट्याचा मृतदेह पडला असल्याची माहिती घोडबंदर परिमंडळ वन अधिकारी मनोज पाटील यांना मंगळवारी मिळाली होती. 

वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल होऊन बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी बोरिवलीच्या संजय गांधी उद्यानात नेण्यात आला. सदर बिबट्या हा नर जातीचा असून त्याचे वजन ५३ किलो इतके होते. त्याच्या पोटाजवळच्या भागात जखम असली तरी मुका मार जबर होता. त्यामुळेच, त्याच्या शरीराच्या अंतर्गत भागात रक्तस्त्राव झाला होता. बिबट्याचा मृत्यू वाहनाच्या धडकेने मार लागल्यामुळे झाला की अन्य काही कारणाने झाला? हे अजून नेमके स्पष्ट झाले नाही. 

दरम्यान, याआधी मुंबई-अहमदाबाद महामार्गावर घोडबंदर खिंडजवळ भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्याच्या मृत्यूच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे, ह्या भागातील रस्ते रुंद केले जात असताना वन्य जीवांच्या सुरक्षिततेसाठी मात्र प्रभावी उपाय व योजना केल्या जात नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

टॅग्स :बिबट्यामुंबईअपघातवनविभाग