Join us
Daily Top 2Weekly Top 5

कचरा गोळा करण्याची 'सेवा' देणारे भलताच 'मेवा' कमावण्याच्या मागे..?; स्वतंत्र कॉल सेंटर सुरू होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 05:49 IST

सर्व्हिस बेस्ट कंत्राटाची लवकरच अंमलबजावणी; मात्र कचरा संकलनातील हेराफेरीवर प्रश्नचिन्ह

सीमा महांगडे मुंबई - पालिका निवडणुकांपूर्वीच कचरा व्यवस्थापनासाठी कचरा संकलनाची करार निश्चिती पालिकेकडून अंतिम करण्यात आली असून, लवकरच त्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे.

दरम्यान, दर्जेदार सेवेसाठी यावेळी पालिकेकडून सर्व्हिस आधारित कंत्राट देण्यात आले असले तरी कचरा संकलनाचे दर प्रतिटन कचऱ्यावर अवलंबून असल्यामुळेच यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. मुंबईत प्रतिदिन ७ हजार मेट्रिक टन कचरा निर्माण होत असला तरी डम्पिंगवर जाणाऱ्या कचऱ्याच्या वजनात होणारी हेराफेरी कशी रोखणार, याचे उत्तर यासाठीच्या कुठल्याही करारातून समोर आलेले नाही. पालिकेकडून घनकचरा व्यवस्थापनासाठी मुंबईत तब्बल ४,८५९ कोटींचे सर्व्हिस बेस कंत्राट निश्चित करताना ते आठ गटांमध्ये विभागले आहे.  

तक्रारींसाठी काॅल सेंटरमुंबईतील २१ वॉर्डांमध्ये पालिकेकडून अंतिम करण्यात आलेल्या एजन्सीज कचरा संकलनाचे काम करणार आहेत. या कंपन्यांकडून प्रस्तावित चढ्या दरांमुळे कंत्राटदाराचा खर्च वाढल्यामुळे विरोधकांकडून या प्रकल्पाला बराच विरोध झाला. मात्र पालिका निवडणुकीच्या आधी वाटाघाटीतून पालिकेकडून हे कंत्राट अंतिम करण्यात आले. या कंत्राटात कचरा उचलणे, कचरा पेटींची निगा, परीक्षण, परिवहन अशी कामे एकाच संबंधित कंत्राटदारांकडून करण्यात येणार आहेत. कचऱ्याच्या तक्रार निवारणासाठी स्वतंत्र कॉल सेंटर सुरू केले जाणार आहे. 

मुंबईतील रस्त्यांची आता दिवसातून दोनवेळा स्वच्छता (सेकंड स्वीपिंग) ही करण्यात येईल. दरम्यान, दिवसभरात किती कचरा गोळा केला जाणार, यावर कचरा संकलनाची अंतिम देयक अवलंबून असणार आहे. त्यामुळे रिफ्युज स्टेशन्स किंवा डम्पिंग ग्राउंडवर कचरा हस्तांतरित करताना कचऱ्याच्या वजनात केली जाणारी फेरफार नाकारता येणार नाही.

मुंबई कुठे पडतेय कमी?शेजारीच असणाऱ्या अहमदाबाद,सुरत यासारख्या शहरांशी तुलना केली असता मुंबई महानगरपालिका कचरा संकलन आणि व्यवस्थापनात नेमकी कुठे कमी पडते याचा अंदाज येतो. अहमदाबाद आणि सुरत शहरातील कचरा व्यवस्थापन प्रणालीमुळे २०२४ मध्ये स्वच्छ वायू सर्वेक्षणात सुरत शहराला प्रथम क्रमांक मिळाला आहे. तसेच २०२५ मध्ये अहमदाबाद शहराला भारतातील सर्वात स्वच्छ शहर पुरस्कार प्राप्त झाला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai's waste collection contracts raise corruption concerns; call center planned.

Web Summary : Mumbai's new waste management contracts, worth ₹4,859 crores, face corruption allegations due to weight-based payment. Despite a call center for complaints and increased street cleaning, manipulating waste weight remains a concern. Comparisons with Surat and Ahmedabad highlight Mumbai's shortcomings in waste management.
टॅग्स :कचरामुंबई महानगरपालिका