Join us  

अंध बांधवांची कमाल, केवळ तीन तासांत सर केला 'किल्ले राजगड'; होती स्वराज्याची पहिली राजधानी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 3:32 PM

या उपक्रमांतर्गत यावर्षी तब्बल ५० अंध बांधवांना स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या किल्ले राजगडाची सफर घडवली आहे. 

महाराष्ट्राच्या पश्चिमेस असलेल्या आणि एखाद्या सिंहा प्रमाणे भासणाऱ्या सह्याद्रीच्या पर्वत रांगांमधील शिखरे आणि किल्ले, तरुणांना नेहमीच ट्रेकिंगसाठी, पर्यटनासाठी खुनावत असतात. शेकडो पर्यटक आणि गिर्यारोहक, या शिखरांना आणि किल्ल्यांना भेटी देतात आणि ट्रेकिंगचा थरार अनुभवतात. यात छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गड किल्ल्यांचाही समावेश आहे. या गड किल्ल्यांची माती मस्तकी लावावी अशी सर्वांचीच इच्छा असते. पण जे अंध बांधव आहेत त्यांचे काय? तर अशा अंध बांधवांसाठी हा थरार अनुभवण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे ‘नयन फाऊंडेशन’ नावाच्या एका संस्थेने. या संस्थेने एक अभिन उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत यावर्षी तब्बल ५० अंध बांधवांना स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या किल्ले राजगडाची सफर घडवली आहे. 

‘नयन फाऊंडेशन’ने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. यात संस्थेने म्हटले आहे, "आपण डोळसपणे अनेकदा धडपडतो, पण मग डोळ्यासमोर पसरलेल्या काळ्याकुट्ट अंधारात अंध व्यक्ती आपला मार्ग कसा शोधत असतील याचे सामान्य माणसाला नेहमीच आश्चर्य वाटते. अंध व्यक्ती सामान्य आयुष्य जगू शकत नाही, असा त्यांचा समज असतो. मात्र हा समज चुकीचा आहे. दिव्यांग व्यक्तींच्या शारिरीक कमतरतेची भरपाई देवाने मानसिक बळ देऊन केलेली असते. त्यांची जिद्द आणि आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन डोळस माणसालाही लाजवेल असा असतो. इच्छाशक्तीच्या जोरावर ते सुदृढ माणसाच्या बरोबरीचे आयुष्य जगू शकतात. गरज असते ती आपण त्यांच्यावर विश्वास दाखविण्याची, त्यांना प्रोत्साहन देण्याची. अंध बांधवांची जीवनातील थरार अनुभवण्याची संधी मिळवून देणाऱ्या ‘नयन फाऊंडेशन’ने नेमके हेच केले आहे."

"प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर नयनने ५० अंध बांधवांना स्वराज्याची पहिली राजधानी किल्ले राजगडाच्या सफरीवर नेण्याचा संकल्प केला. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी १३ डोळस स्वयंसेवकांनी साथ दिली. विशेष म्हणजे, सह्याद्री पर्वत रांगेतील राज्यातील सर्वोच्च शिखर अर्थात कळसूबाई (१६४६ मीटर) नयनच्या अंध बांधवांनी लिलया सर केला आहे," असेही संस्थेने म्हटले आहे.

संस्थेने म्हटले आहे की, "सह्याद्रीच्या पर्वतरांगेत वसवलेला, स्वराज्याची पहिली राजधानी राजगड किल्ला सर करण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते. मुंबई येथील ५० दृष्टीहिन बांधवांनी प्रजाकसत्ताक दिनी किल्ले राजगड सर करुन आपली इच्छा तर पूर्ण केली सोबत त्यांनी एक विलक्षण अनुभव घेतला. सकाळी नऊ वाजता किल्ले चढण्यासाठी सुरुवात केली, या बांधवांनी अपेक्षित वेळेपेक्षा अवघ्या साडेतीन तासात मोहीम फत्ते केली."

"अंशतः अंध असलेला देवेंद्र पोन्नलगर दक्षिण भारतीय असूनही त्याला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल नितांत आदर, प्रेम आणि महाराष्ट्राबद्दल प्रचंड जिव्हाळा आहे. त्याला स्वत:ला ट्रेकिंगची खूप आवड असून त्याने अनेक किल्ल्यांना भेट दिली आहे. आपल्याप्रमाणेच अंध व्यक्तिंनाही महाराजांचे किल्ले अनुभवता यावे, त्यांना जीवन अनुभवण्यासाठी एक व्यासपीठ मिळावे या उद्देशाने २०१० साली त्याने आणि रुईया महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मिळून ‘नयन फाऊंडेशन’ ही संस्था स्थापन केली. संस्थेच्या स्थापनेनंतर दरवर्षी २६ जानेवारीला अंध बांधवांसाठी ट्रेक आयोजित केला जातो. पहिल्या वर्षी शिवनेरी गडावरच्या ट्रेकमध्ये १६ अंध मुलं सहभागी झाली होती. शिवरायांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी गडावर जाण्याचा अनुभव या मुलांना आयुष्यात खूप काही देऊन गेला होता. त्यानंतर ट्रेकला अंध बांधवांचा प्रतिसाद वाढतच गेला," असेही संस्थेने केलेल्या पोस्ट मध्ये सांगण्यात आले आहे.

टॅग्स :ट्रेकिंगगडपुणे