Join us
Daily Top 2Weekly Top 5

रंगीबेरंगी फुलांनी बहरणार महामार्गावरील दुभाजक; मनपाचा उपक्रम  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2024 09:52 IST

महापालिकेच्या उद्यान विभागाने अलीकडेच शहरातील अनेक उद्यानांचा  कायापालट केला आहे.

मुंबई : महापालिकेच्या उद्यान विभागाने अलीकडेच शहरातील अनेक उद्यानांचा   कायापालट  केला आहे. रस्त्यालगतच्या झाडांच्या खोडाभोवतीही रोपटी लावून झाडांच्या खोडाचा भाग अधिक आकर्षक केला जात आहे. याचेच पुढचे पाऊल म्हणून आता महामार्ग, मुख्य रस्त्यांवरील दुभाजक अधिक आकर्षक करण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे. 

दुभाजकाच्या ठिकाणी यापूर्वी फक्त हिरवी झुडपे लावली जात होती. आता तेथे वेगवेगळ्या रंगांतील फुलझाडांची लागवड केली जात आहे. त्यामुळे दुभाजकांमध्ये फुले बहरणार असून, प्रवासही आल्हाददायक होणार आहे. 

उद्यान विभाग सातत्याने नवनवे उपक्रम  राबवत आहे. उद्यानांमध्ये वेगळ्या प्रकारची झाडे लावली जात आहेत. जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरील मातोश्री मीनाताई ठाकरे सारख्या उद्यानामध्ये शिल्पग्राम तयार करण्यात आले आहेत.  

प्रवास होणार अल्हाददायक-

१) महाराष्ट्रातील बारा बलुतेदार, त्यांची जीवनपद्धती यांच्या संकल्पनेवर आधारित बारा बलुतेदार, प्राचीन खेळ, नृत्ये यांचीही शिल्पे उभारण्यात आली आहेत. 

२)  ‘ए’ वॉर्डमधील कुलाबा वुड गार्डनमध्ये आकर्षक झाडे लावण्यात आली आहेत.

३) पवई येथील अटलबिहारी वाजपेयी उद्यानात लहान मुलांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

प्रदूषण कमी करण्याचा उद्देश -

१)  मुंबई आणखी हिरवीगार करण्यावर उद्यान विभागाचा भर असून, प्रदूषण कमी करणे हा त्यामागील मुख्य उद्देश आहे. त्यासाठी पूर्व द्रुतगती महामार्गावर विक्रोळी ते भांडुप पट्ट्यात बांबूच्या ८० हजार झाडांची लागवड करण्यात येणार होती. मात्र मीठ आयुक्तालयाने आक्षेप घेतल्याने हा उपक्रम रखडला आहे. 

२)  परिणामी आता महामार्ग, मुख्य रस्ते, त्यावरील दुभाजकांमध्ये  विविध रंगीबेरंगी फुलझाडे लावण्यावर भर दिला जात आहे. यापूर्वी दुभाजकांवर हिरवी रोपटी लावली जात होती. मात्र आता  रंगीबेरंगी फुलझाडे लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

 तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार निवड-

१)  दुभाजकांवर लावण्यात येणारी फुलझाडे कोणत्या प्रजातीची असावीत, यासाठी या विषयातील तज्ज्ञ मंडळींचा अभिप्राय घेतला जातो. 

२) दुभाजक हे रस्त्याच्या मध्यभागी असतात. दुतर्फा वाहनांची सतत वर्दळ असते. त्यामुळे प्रदूषण जास्त असते, म्हणूनच प्रदूषणाचा सामना करणाऱ्या प्रजातींची निवड केली जाते. 

३) दुभाजकांवर फुलझाडे लावण्याचा उपक्रम हा प्रायोगिक तत्त्वावर राबवला जात आहे. त्यास यश आल्यास तो मोठ्या प्रमाणावर राबवला जाणार आहे, असे उद्यान विभागाकडून सांगण्यात आले. 

टॅग्स :मुंबईनगर पालिकारस्ते वाहतूक