- राजेश पिल्लेवार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : त्यांना कुटुंबाने नाकारले. समाजाने उंबरठ्याबाहेर ठेवले. पोटासाठी हात पसरणे नशिबी आले. पण, हे जगणे झुगारून तिघी एकत्र आल्या. एकमेकींचे हात हाती घट्ट धरले आणि त्यातून साकारले सन्मानाचे जगणे...
जया जाधव, रिटा म्हात्रे आणि सिमरन वालिया. तिघीही तृतीयपंथी. इतर तृतीयपंथीयांसारख्याच टाळी वाजवून ‘ए, दे ना दस...’ म्हणायच्या. पण, कुणीतरी मनातली सल चेतवली. आधार दिला. आज त्या छोट्याशा का होईना ‘बिझनेस वुमन’ झाल्या आहेत. ठाण्याच्या कळवा परिसरात तिघींनी आणखी सात जणींना साथीला घेत सहा वर्षांपूर्वी ‘त्रिरत्न तृतीयपंथी बचतगटा’ची स्थापना केली. टाळी वाजवणारे हात आता लोणचे, मसाले, अगरबत्त्या, पापड-मसाले आदी उत्पादने तयार करू लागले. रास्त भावात विक्रीसाठी उत्पादने सज्ज झाली. सुरुवातीला ओळखीची उपेक्षाच आली. पण, जिद्दीने अपार कष्ट उपसले. डोक्यावर बर्फ, जिभेवर साखर आणि डोळ्यांत आर्जव. हळूहळू ग्राहकी जमली. आता बऱ्यापैकी नाव झाले आहे. लोक आवर्जून उत्पादने घेतात. त्याला कष्टाचा सुगंध येतो.
बीकेसी ग्राउंडवर सुरू असलेल्या ‘उमेद’ अभियानाच्या ‘महालक्ष्मी सरस’ प्रदर्शनात तुमची त्यांच्याशी भेट होईल. त्यांच्या स्टॉलवर आवर्जून जा. तुमचं साधंच पण अगत्यानं स्वागत होईल.
आज शेवटचा दिवस
राज्यातील महिला बचत गटांच्या कष्टाला ‘महालक्ष्मी सरस’ने जागतिक व्यासपीठ मिळवून दिले आहे. येथे ग्रामीण महाराष्ट्राची संस्कृती, हस्तकला आणि चविष्ट खाद्यपरंपरेचा संगम अनुभवायला मिळतो. उद्या, रविवारी प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे.
कौतुकाचा विषय
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने सुरू केलेले महत्त्वाकांक्षी ‘उमेद’ अभियान ‘त्रिरत्न तृतीयपंथी बचतगटा’सारख्या शेकडो महिलांच्या कष्टाला संधीची साथ देत आहे. यंदा ‘त्रिरत्न’ला प्रथमच संधी मिळाली. हा स्टॉल कौतुकाचा विषय ठरला आहे.
जिद्दीने नशिबाच्या रेषा पालटतात. कुटुंबाची आठवण येते. डोळे भरून येतात, पण ‘आपल्या पाठीशी कोणीतरी आहे’ ही भावना पुन्हा कामाला लावते. छोट्याशा भांडवलावर सुरुवात केली. आता वर्षाकाठी ३ ते ४ लाखांपर्यंत उलाढाल पोहोचली आहे.
आणखी सात जणींचे पोट त्यावर भरते. समाधानी आहोत.
जया जाधव
Web Summary : Rejected by family, a transgender group in Thane, 'Triratna', overcame adversity. They produce and sell homemade products like pickles and spices, finding success at the 'Mahalakshmi Saras' exhibition, supported by the 'Umed' campaign, showcasing their resilience and hard work.
Web Summary : परिवार द्वारा अस्वीकृत, ठाणे में एक ट्रांसजेंडर समूह 'त्रिरत्न' ने प्रतिकूल परिस्थितियों को पार किया। वे आचार और मसालों जैसे घरेलू उत्पाद बनाते और बेचते हैं, 'महालक्ष्मी सरस' प्रदर्शनी में सफलता पाते हैं, जिसे 'उमेद' अभियान का समर्थन प्राप्त है, जो उनकी लचीलापन और कड़ी मेहनत को दर्शाता है।