- जयंत हाेवाळविशेष प्रतिनिधी
र्द वृक्षराजी, पाण्याचा खळाळता प्रवाह, ऋतूमानानुसार दिला जाणारा आहार, पावसाळ्यात प्राणी भिजू नयेत म्हणून पिंजऱ्यांवर टाकले जाणारे आच्छादन... अशा चोख व्यवस्थेमुळे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयातील पशु-पक्षी उन्हाळा -पावसाळा मजेत काढतात.
उद्यानांत मोठ्या संख्येने झाडे आहेत. पावसाला सुरुवात होण्यापूर्वी त्यांच्या वाढलेल्या फांद्या छाटल्या जातात. कारण त्या पिंजऱ्यांवर पडण्याची शक्यता असते. उद्यानातील पिंजऱ्यांची उभारणीच विशिष्ट पद्धतीने करण्यात आली आहे. पिंजऱ्यावर झाडांची सावली येईल, अशा रितीने ते उभारण्यात आले आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात प्राण्यांना त्रास होत नाही. मुळात अन्य राज्यांच्या तुलनेत मुंबईत तेवढा तीव्र उकाडा नसतो. त्यामुळे प्राण्यांना फार त्रास होत नाही. शिवाय उद्यानात हजारो झाडे असल्याने तापमान आपोआप नियंत्रित राहते.प्राणिसंग्रहालयात पाण्याचा प्रवाह खळाळत असतो. त्यामुळे शिवाय प्राणी कधीही पाण्यात डुंबण्याचा आनंद घेऊ शकतात. त्यामुळे थंडाव्यासाठी स्प्रिंकलरची गरज नसते, अशी माहिती उद्यानातील अधिकाऱ्याने दिली.
पावसाळ्यात किंवा उन्हाळ्यात त्वचाविकार किंवा संसर्गजन्य आजार होतात का, अशी विचारणा अधिकाऱ्याकडे केली असता, प्राण्यांची नित्यनेमाने वैद्यकीय तपासणी होत असते, त्यामुळे असे प्रकार फारसे होत नाहीत. एखाद्या प्राण्याच्या बाबतीत काही लक्षणे आढळली तर तत्काळ तपासणी करून उपचार केले जातात, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
ऋतुनुसार आहारात बदलऋतूमानानुसार प्राण्यांच्या आहारातही बदल केले जातात. उन्हाळ्यात मांस असलेले बर्फाचे गोळे मांसाहारी प्राण्यांना दिले जातात. शाकाहारी प्राण्यांनाही उन्हाळ्यात थंड आहार दिला जातो. उन्हाळ्यात प्राण्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकून राहावे यासाठी कलिंगड, टरबूज अशी रसाळ फळे दिली जातात.
पेंग्विनचा माशांवर तावप्रत्येक प्राण्याचा आहार ठरलेला असतो. त्यात अधूनमधून बदलही केले जातात. पेंग्विन मात्र रोज माशांवर ताव मारत असतात.