मुंबई : टोरेस फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपींचा शोध सुरू असताना, त्यांनी बल्गेरियातही अशाच प्रकारे फसवणुकीचे दुकान थाटल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखा याप्रकरणी अधिक तपास करत आहे.
मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि मीरा-भाईंदर या भागांतील हजारो गुंतवणूकदारांचे कोट्यवधींचे नुकसान केल्यानंतर फरार आरोपींनी बल्गेरियामध्ये टोरेसप्रमाणे गुंतवणूक योजना राबविण्यास सुरुवात केली केली. त्यासाठी नव्या नावाने शोरूम उघडली आहे, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेला मिळाली आहे.
त्यानुसार या माहितीची
पडताळणी सुरू असून आवश्यक कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.
युक्रेनियन नागरिक असलेल्या मुख्य आरोपीने हा सर्व कट रचला होता. या प्रकरणात युक्रेनमधील आठ नागरिक आणि एक तुर्कस्तानमधील नागरिक सध्या फरार आहेत.
‘मोईझोनाईट टी’ या नावाने बल्गेरियामध्ये कार्यालय थाटून फसवणूक सुरू केल्याचे समोर येताच आर्थिक गुन्हे शाखेने याबाबत सरकारला माहिती दिली आहे. पुढे, तेथून बल्गेरियातील यंत्रणांना अलर्ट केल्याचे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. यामध्ये याच युक्रेनियन नागरिकांचा समावेश असल्याची शक्यता आहे.
ब्लू कॉर्नर नोटीस जारी
पोलिसांनी संशयित सूत्रधार ओलेना स्टोइयान, व्हिक्टोरिया कोव्हालेन्को, मुस्तफा कराकोच, ओलेक्झांडर बोराविक, ओलेक्झांडर झापिचेंको, ओलेक्झांड्रा ब्रुंकीव्स्का, ओलेक्झांड्रा त्रेडोखिब, आर्टेम ओलिफरचुक आणि इयुर्चेंको यांच्या विरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी करत त्यांचा शोध सुरू आहे.