Join us
Daily Top 2Weekly Top 5

तामिळनाडूच्या तंजावरमध्ये होणार १००व्या मराठी नाट्य संमेलनाची सुरूवात

By संजय घावरे | Updated: December 25, 2023 19:26 IST

२९ डिसेंबरला सांगलीत विष्णुदास भावेंना अभिवादन करून नाट्य संमेलनाची मुहूर्तमेढ रोवणार

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: १००व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. २७ डिसेंबरला सायंकाळी ६ वाजता नाटककार शाहराज राजे भोसले यांच्या नाट्य वाङमयाला वंदन करून तसेच नटराज पूजनाने शंभराव्या नाट्य संमेलनाचा प्रारंभ केला जाणार आहे. त्यानंतर पिंपरी-चिंचवड येथे ५ ते ७ जानेवारी २०२४ या काळात १०० व्या नाट्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा होणार आहे. 

मराठी रंगभूमीचे पहिले नाटककार शाहराज राजे भोसले (१६७०-१७१२) यांच्या नाट्य वाङमयाला वंदन करून शंभरावे नाट्य संमेलन सुरू होणार आहे. तामिळनाडूतील तंजावर येथील सरस्वती महालात हे नाट्य वाङमय सुरक्षित असून, नाटककार शाहराज राजे भोसले यांनी एकूण २२ मराठी नाटके लिहिली आहेत. १६९०मध्ये रंगभूमीवर आलेले 'लक्ष्मी नारायण कल्याण' हे पहिले मराठी नाटक मानले जाते. या नाटकात 'लक्ष्मी नारायण' यांच्या लग्नाची कथा होती. शंभराव्या नाट्य संमेलनाचे नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ. जब्बार पटेल आहेत. हा नाट्य ग्रंथ वंदन सोहळा ९९ व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी जिल्हाधिकारी दीपक जेकब, तमीळ विद्यापीठ तंजावर कुलगुरू प्रो. थिरूवल्लूवम, छत्रपती शिवाजी महाराजांचे आठवे वारसदार शहाजी राजे भोसले, नाट्य परिषदेचे कोषाध्यक्ष सतीश लोटके, कार्यकारी समिती सदस्य गिरीश महाजन, ज्येष्ठ नाट्यकर्मी आनंद कुलकर्णी, विवेकानंद गोपाल आदी उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने नांदी, गणेश वंदना, नटराज नृत्य व शाहराज राजे भोसले लिखीत 'लक्ष्मी नारायण कल्याण' या नाटकातील प्रवेश नाट्यसंमेलनाध्यक्ष प्रेमानंद गज्वी व कोषाध्यक्ष सतीश लोटके सादर करणार आहेत. याखेरीज विविध सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केले जाणार आहेत. २९ डिसेंबर रोजी सांगली येथे 'संगीत सीता स्वयंवर'कार विष्णुदास भावे यांना अभिवादन करून नाट्य संमेलनाची मुहूर्तमेढ रोवण्यात येईल. त्यानंतर पुणे, पिंपरी चिंचवड शाखेकडे नटराज व नाट्य वाङमय सुपूर्द करण्यात येणार आहे. १०० व्या नाट्य संमेलनानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येणार असून, सर्व कार्यक्रमांना रसिकांनी व नाट्यकर्मींनी उपस्थित रहावे असे आवाहन परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी केले आहे.

टॅग्स :मराठी नाट्य संमेलन