Join us

‘त्या’ सुपरवुमन केबिन क्रूमुळे जीव वाचला; पुणे-दिल्ली विमानात प्रवासी पडला होता बेशुद्ध 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 07:05 IST

या विमानातील प्रवासी संचित महाजन यांनी याबाबतची माहिती सोशल मीडियावर शेअर करत तिचे कौतुक केले आहे.

मुंबई : ‘इंडिगो’च्या विमानाने पुण्याहून दिल्लीला जाणारा एक ७० वर्षीय प्रवासी भर प्रवासात बेशुद्ध झाला. मात्र, विमानातील महिला केबिन कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानाने आणि तिने केलेल्या प्राथमिक उपचारांमुळे या प्रवाशाचे प्राण वाचले आहेत. ही घटना १२ जानेवारी रोजी घडली.

या विमानातील प्रवासी संचित महाजन यांनी याबाबतची माहिती सोशल मीडियावर शेअर करत तिचे कौतुक केले आहे. त्यांनी लिहिलेल्या पोस्टनुसार, पुण्याहून हे विमान दिल्लीला निघाल्यानंतर या विमानातील एका वृद्ध प्रवाशाला अस्वस्थ वाटू लागले.  या प्रवाशाने आपली शुद्ध हरपत असताना केबिन कर्मचाऱ्यांना बोलावण्याचे बटण दाबले. दोन तीन वेळा सलग बटण दाबल्यामुळे विमानातील कर्मचारी तातडीने त्याच्या आसनाच्या दिशेने धावले. तेवढ्यात हा प्रवासी बेशुद्धावस्थेत गेला.

काही वेळाने तो बेशुद्धावस्थेत गेला. त्यानंतर वैमानिकाने विमानात घोषणा करत कुणी डॉक्टर आहे का, याची विचारणा केली. मात्र, विमानात कुणीही डॉक्टर नव्हता. त्यावेळी या केबिन कर्मचारी महिलेने पुढे येत संबंधित व्यक्तीला ऑक्सिजन पुरवठा दिला. त्याच्या जवळ बसत त्याला आधार दिला. 

जवळपास ३० ते ४० मिनिटांनी तो प्रवासी शुद्धीत आला. त्यावेळी तिच्या डोळ्यांत अश्रू आले होते. त्यानंतर त्या प्रवाशाने तिचे आभार मानले. इंडिगो कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधनाबद्दल आणि घेतलेल्या काळजीबद्दल महाजन यांनी लिहिलेल्या पोस्टचे देखील अनेकांनी कौतुक केले आहे.

टॅग्स :इंडिगो