Join us

‘त्या’ बाळाला अखेर नुकसानभरपाई, आरोग्य विभाग खडबडून जागा झाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2023 07:28 IST

प्राथमिक आरोग्य केंद्रावर नवजात बालकाचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याचे प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: प्राथमिक आरोग्य केंद्रावर वैद्यकीय अधिकारी नसल्याने नवजात बालकाचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याप्रकरणी दुखावलेल्या पालकांनी थेट राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाकडे धाव घेतली. अखेरीस आयोगाच्या दट्ट्यानंतर राज्यातील आरोग्य विभागाने पालकांना नुकसानभरपाई देण्याची तयारी दर्शविली असून, शुक्रवार, १६ जूनच्या आत ही रक्कम पालकांना दिली जाणार आहे.

या संदर्भात सविस्तर वृत्त असे की, यवतमाळ जिल्ह्यातील विडूळ प्राथमिक आरोग्य केंद्रावर शुभांगी हापसे त्यांच्या नवजात बालकाला उपचारासाठी घेऊन गेल्या होत्या. मात्र, आरोग्य केंद्रावर वैद्यकीय अधिकारीच नसल्याने नवजाताचा उपचाराअभावी मृत्यू झाला. पालकांनी या संदर्भात संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा केला. मात्र, त्याला प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी थेट राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाकडे दाद मागितली. आयोगाने गेल्या वर्षी तक्रार दाखल करून घेतली.

या प्रकरणी आयोगाने चौकशी अहवालही सादर केला. त्यात २५ एप्रिल रोजी हापसे यांना १६ जूनपूर्वी नुकसानभरपाईची २५ हजार रुपये रक्कम द्यावी, असे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार सार्वजनिक आरोग्य विभागाने ही रक्कम तत्काळ देण्याचा निर्णय घेतला आहे. यवतमाळ येथील जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. नुकसानभरपाईची रक्कम हापसे कुटुंबीयांना दिल्याचा अहवाल पुणे येथील आरोग्य सेवा विभागाचे अतिरिक्त संचालक यांना सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :आरोग्यसरकार