अवघी मुंबापुरी झाली चिंब चिंब...
By Admin | Updated: June 15, 2015 05:43 IST2015-06-15T05:43:14+5:302015-06-15T05:43:14+5:30
मुंबईत दाखल झालेल्या मान्सूनने शनिवारी मुंबईकरांशी पाठशिवणीचा खेळ खेळला खरा; मात्र रविवारी पडलेल्या मुसळधार पावसाने मुंबईकरांच्या नाकी नऊ आणले

अवघी मुंबापुरी झाली चिंब चिंब...
मुंबई : मुंबईत दाखल झालेल्या मान्सूनने शनिवारी मुंबईकरांशी पाठशिवणीचा खेळ खेळला खरा; मात्र रविवारी पडलेल्या मुसळधार पावसाने मुंबईकरांच्या नाकी नऊ आणले. पडणाऱ्या पावसाला कुठे कुठे शिव्यांची लाखोली वाहिली जात असतानाच दुसरीकडे मात्र पावसाच्या थेंबांत भिजणाऱ्या मूडी मुंबईकरांनी जलधारांचा मनमुराद आनंद लुटला.
रविवारी सकाळपासूनच मुंबईवर वरुणराजाने कृपादृष्टी ठेवली. सकाळी १० वाजेपर्यंत अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असतानाच सोसाट्याचा वारा सुटला होता. तर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासोबत येणारे पावसाचे टपोरे थेंब मुंबईला ओलेचिंब करीत होते. विशेषत: सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत पडलेल्या मुसळधार पावसाने मुंबईकरांना चांगलाचा दणका दिला. परंतु या दणक्यातही पावसाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी मुंबईकर तरुणाई घराबाहेर पडली.
वांद्रे-कुर्ला संकुलातील विशाल मैदानांसह ज्या रस्त्यांवर जास्त रहदारी होत नाही, अशा ठिकाणी तरुणांनी क्रिकेटसह फुटबॉलचा खेळ मांडला. तर तरुण दुचाकीस्वारांनी बाईकला किक मारत वाऱ्याच्या वेगाने पडणाऱ्या टपोऱ्या थेंंबांना आपल्या कवेत घेतले. गल्लीबोळातली बच्चेकंपनीही पावसाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी सज्ज झाली आणि पाहता पाहता साचलेल्या पावसाच्या पाण्यात लहानग्यांनी मस्ती लुटली. दुपारी पावसाचा जोर कमी-अधिक होत असतानाच पूर्व आणि पश्चिम उपनगरांतल्या चहाच्या टपऱ्यांसह गरमागरम भजीवर तरुण-तरुणींनी आडवा हात मारला.