सात गावांतील ठाणेकर सीमा हद्दीवर लटकले
By Admin | Updated: July 15, 2015 23:32 IST2015-07-15T23:32:36+5:302015-07-15T23:32:36+5:30
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत ठाणे जिल्ह्यातील चेना,घोडबंदर, काशी, माजिवडा, मीरा, पाचपाखाडी आणि येऊर या सात गावांचा समावेश आहे.

सात गावांतील ठाणेकर सीमा हद्दीवर लटकले
- नामदेव पाषाणकर, घोडबंदर
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत ठाणे जिल्ह्यातील चेना,घोडबंदर, काशी, माजिवडा, मीरा, पाचपाखाडी आणि येऊर या सात गावांचा समावेश आहे. ठाणे आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील ८ हजार ६९६.५१९४ हेक्टर क्षेत्र या उद्यानासाठी राखीव आहे.
यातील काही भागावर झोपड्यांनी अतिक्र मण केल्यामुळे डोंगरपायथ्याशी असलेली काही हेक्टर जागा वनजमिनीमधून वगळण्याचा निर्णय १९८० मध्ये घेण्यात आला. मात्र अद्यापपर्यंत त्याची अंमलबजावणी झालेली नाही. यामुळे ठाण्यातील अंदाजे १५ हजार नागरिक गेल्या ३५ वर्षापासून वनखात्याच्या जाचाला सामोरे जात आहेत.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानांची सीमा पोईसर, आकुर्ली, मालाड, आरे, मरोळ, कांजूर, पासपोली, नाहूर, भांडूप, मुलुंड, ठाणे पाचपाखाडी, चेना, माजिवडे, घोडबंदर, येऊर, कोलशेत, कावेसर अशा विस्तीर्ण परिसरात आखली होती. ८६.९६५ स्केअर किमी पट्ट्यात हे उद्यान आहे. ठाण्यातील वारलीपाडा, कैलासनगर, जुनागाव, रामनगर, हनुमाननगर, इंदिरानगर, कारवलोनगर, कोकणीपाडा, घोडबंदर, कोलशेत भागात असंख्य झोपड्या उभ्या राहिल्या आहेत. त्यात आदिवासींच्या जागादेखील आहेत. वागळे विभागात शासनाने एमआयडीसी उभी करताना वनजमिनीचा आधार घेतला आहे. एमआयडीसीला जागा देताना तिची मोजणी झालेली नाही.
हा सीमावाद सुरु असतानाच झोपड्यांनी व्यापलेल्या वनजमिनीपैकी काही हेक्टर जमीन डीफॉरेस्ट करण्याचा निर्णय घेतला होता.
२००७ मध्ये न्यायालयाने वनजमिनीवरील अतिक्र मणे काढण्याचे आदेश दिले. तसेच जमिनीची संयुक्त मोजणी करण्यास सांगितले होते. परंतु, तशी मोजणी फक्त कागदावर झाल्याचे समजते. न्यायालयासमोर डीफॉरेस्ट जमिनीचा विषय आला नाही. त्यामुळे ठाण्यातील रहिवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
अन्यायाविरोधातील लढा सुरूच राहणार
डीफॉरेस्ट जमिनीबाबतचे कागदपत्रे हाती लागल्यानंतर त्याचा पाठपुरावा सुरु असून ती कागदपत्रे वनखात्याकडे सुपूर्द केली असून हा मुद्दा न्यायालयाच्या लक्षात आणून देण्याची मागणी केली आहे. याबाबत खात्री करून वरिष्ठांना माहिती दिली जाईल, असे या विभागाने सांगितले. एमआयडीसीच्या हद्दीचा वाद आणि डीफॉरेस्ट झालेली जमीन यामुळे अनेकांनी पुनर्वसनाचे पैसे भरलेले नाहीत.
सीमांकन करून डीफॉरेस्ट जमीन वगळण्यात येत नाही तोवर आमचा अन्यायाविरोधातील लढा सुरूच राहील, असे झोपडपट्टी बचाव संघाचे अध्यक्ष बाबासाहेब कांबळे यांनी सांगितले.
हजारो हेक्टर क्षेत्र उद्यानासाठी राखीव
माजिवडा कोकणीपाडा सर्वे नंबर ४१९ पैकी ४.१० हेक्टर,पाचपाखाडी रामनगर नंबर १ सर्वे नंबर ५१९/२ १.२० हेक्टर,५१९/३ कैलासनगर ४.१० हेक्टर,सर्वे नंबर ५२०/१ रामनगर नंबर १ .०२४ हेक्टर ५२०/२ .०२४ हेक्टर,५२०/१ कारवलोनगर ४.१० हेक्टर,घोडबंदर सर्वे नंबर २१७ /१/२ १.५० हेक्टर, कोलशेत सर्वे नंबर २९१ मधील ६.२४ हेक्टर जमीन डीफॉरेस्ट केली होती.---