ठाणेकरांनो मालमत्ताकर आता मोबाइलवरूनही भरा
By Admin | Updated: July 3, 2015 22:36 IST2015-07-03T22:36:06+5:302015-07-03T22:36:06+5:30
ठाणेकरांना आता मालमत्ता कराचा भरणा करणे आणखी सुलभ होणार आहे. त्यासाठी प्रभाग समिती अथवा मुख्यालयात रांगेत उभे राहण्याची गरज उरणार नसून ठाणेकरांना आता मोबाइलवरून

ठाणेकरांनो मालमत्ताकर आता मोबाइलवरूनही भरा
ठाणे : ठाणेकरांना आता मालमत्ता कराचा भरणा करणे आणखी सुलभ होणार आहे. त्यासाठी प्रभाग समिती अथवा मुख्यालयात रांगेत उभे राहण्याची गरज उरणार नसून ठाणेकरांना आता मोबाइलवरून सहज चालताबोलता कर भरता येणार आहे. यासाठी पालिकेने नवीन तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे.
महापालिका हद्दीत आजघडीला अधिकृत सुमारे ९६ हजार १३१ आणि अनधिकृत २ लाख २८ हजार ९२२ असे मिळून एकूण ३ लाख २५ हजार ५३ मालमत्ताधारक आहेत. या सर्व ग्राहकांना यापूर्वी प्रभाग समिती कार्यालय अथवा मुख्यालयात येऊन लांबचलांब रांगा लावाव्या लागत होत्या. फेब्रुवारी २०१४ मध्ये आॅनलाइन पद्धतीने कर भरण्याची सुविधा महापालिकेने उपलब्ध करून दिली. परंतु, पहिल्याच वर्षी यात अनेक तांत्रिक बाबींमध्ये बिघाड झाल्याने याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. पहिल्या वर्षी केवळ ३५० मालमत्ताधारकांनीच आॅनलाइन पद्धतीने कराचा भरणा केला होता. त्यानंतर, यंदाच्या वर्षात सुमारे ५ हजार मालमत्ताधारकांनी आॅनलाइन पद्धतीने कराचा भरणा केला. मालमत्ताधारकांची संख्या पाहता हा आकडा फारच कमी असल्याने आता पालिकेने यापुढे जाऊन मोबाइलवरही आॅनलाइन कराचा भरणा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
यापूर्वी मालमत्ताकराचे पोर्टल हे सिल्व्हर लाइट या तंत्रज्ञानावर आधारित होते. आता ते पोर्टल जावा स्क्रिप्ट-एचटीएमएल-५ या तंत्रज्ञानावर आधारित बनविल्याने आता ते सहजपणे वापरणे शक्य होणार आहे. हे पोर्टल वापरण्यास अतिशय सुलभ असून ते आता आयपॅड, मोबाइल आणि टॅबलेटवरही सहज डाऊनलोड होत असल्याने नागरिकांना आता आपला मालमत्ताकर भरणे अधिक सोयीचे होणार आहे. त्यामुळे या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे. (प्रतिनिधी)
आॅनलाइन भरण्यासाठी पालिकेच्या वेबसाइटवरwww.thanecity.gov.in जाऊन अथवा https://propertytax.thanecity.gov.in/TmcpropertyTax/Citizen/index.html थेट जाऊन कराचा भरणा करता येणार आहे.