ठाण्यात जलवाहिनी फुटली; मुंबईवर पाणीसंकट
By Admin | Updated: March 29, 2015 01:49 IST2015-03-29T01:49:11+5:302015-03-29T01:49:11+5:30
मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ठाण्यातील किसननगर भागात फुटली.

ठाण्यात जलवाहिनी फुटली; मुंबईवर पाणीसंकट
७०० घरांत घुसले पाणी : १५ घरे पूर्णत: उद्ध्वस्त, १८ जण जखमी; ठाण्यातील १५ हजार नागरिकांना फटका
ठाणे : मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ठाण्यातील किसननगर भागात फुटली. १,८०० मिलीमीटरच्या (७२ इंच व्यासाची) असलेल्या या जलवाहिनीच्या दोन्ही बाजूंच्या ७०० घरांमध्ये पाणी शिरले. १५ घरे पूर्णत: उद्ध्वस्त झाली असून, पाण्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. यात १८ जण जखमी झाले असून, १५ हजार नागरिकांना याचा फटका बसला आहे. घरात पाणी शिरल्याने विस्थापित झालेल्यांना तात्पुरत्या स्वरूपात एमएमआरडीएच्या घरांमध्ये हलविण्यात आले आहे.
जलवाहिनी फुटल्यामुळे जोरदार वाहणाऱ्या पाण्याचा वेढा दोन्ही बाजंूच्या झोपड्यांना पडला. झोपड्यांमध्ये पाणी शिरले. पाण्याचा अंदाज आल्याने पळापळ सुरू झाली. काही जण घरातच अडकले. पाण्याचा प्रवाह पाहता त्यात तीन ते चार जण वाहून गेल्याचा कयास लावण्यात आला, त्या दृष्टीने शोधाशोधही सुरू होती; परंतु ती अफवा ठरली.
घटनेची माहिती मिळताच जलवाहिनीचे व्हॉल्व बंद करून तिचे काम युद्धपातळीवर सुरू झाले. परंतु दुसरीकडे आजूबाजूच्या झोपड्यांमध्ये शिरलेले पाणी ओसरण्यास वेळ जाऊ लागल्याने त्या ठिकाणी अडकलेल्यांना वाचविण्यासाठी ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन कक्ष, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि बचावकार्य सुरू झाले. अखेर दोन तासांच्या बचावकार्यानंतर सुमारे ७०० घरांत अडकलेल्या रहिवाशांना बाहेर काढण्यात आले. यात १८ जण जखमी झाले आहेत. त्यातील कमल दुकाळे, जगन गुंजाळ, अशोक यादव, महादू जगदाळे आणि रामलाल हे चार जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. तसेच त्यातील चार ४ जण गंभीर असून, त्यांच्यावर ठाण्यातील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.